येत्या 10 जूनला छगन भुजबळ पुन्हा सक्रिय होणार
नागपूर, दि. 10, मे - महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी तब्बल दोन वर्षे तुरुंगवासानंतर जामीन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येत्या 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनापासून पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांचा 4 मे रोजी जामीन मंजूर केला. यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून लवकरच त्यांना सुटी मिळणार आहे. पक्षाच्या राजकारणात परत सक्रिय होण्याची त्यांची तयारी आहे. ओबीसींचे नेते असलेल्या छगन भुजबळ यांच्यासाठी राष्ट्रवादीनेही 10 जूनचा मुहूर्त काढला. पक्षाचा वर्धापन दिवस पुण्यात साजरा करण्यात येणार आहे. पक्षाकडून सरकारविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचा समारोप आणि वर्धापन दिनाचे औचित्य साधून एकच कार्यक्रम होणार असून यात छगन भुजबळ मुख्य आकर्षण राहतील.
राज्यात ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भुजबळांच्या माध्यमातून परत भरून काढण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे. या कार्यक्रमात भुजबळ यांची तोफ पूर्वीप्रमाणेच धडाडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे सेकंड इन चीफ प्रफुल्ल पटेल यांनीही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भुजबळ उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दोन दिवसांपूर्वीच त्यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्यांचा उत्साह पूर्वीसारखाच आहे. ओबीसींसाठी परत आवाज बुलंद करून आतापर्यंत झालेल्या अन्यायाला ते वाचा फोडतील. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची त्यांनी तयारी दर्शवली असल्याचे पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पुढची निवडणूक पटेल लढणार:- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी उमेदवार बदलण्यात आला आहे. पुढच्या वर्षी होणार्या सार्वत्रिक निवडणुक ीत प्रफुल्ल पटेल वा त्यांच्या पत्नी वर्षा लढणार आहेत. दस्तुरखुद्द पटेल यांनी तसे संकेत दिले. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. सुरुवातीला त्यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केले. परंतु, आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे कायम राहिली. यात राष्ट्रवादीने नवीन चेहरा दिला आहे. पटेल यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी राहणार्या उमेदवाराला पुढच्या निवडणुकीत संधी मिळणार नसल्याची कल्पना आहे. तशी चर्चाही इच्छुक उमेदवारांशी केली. त्यास सहमती मिळाल्यानंतर त्यादृष्टीने आमची तयारी झाली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.