Breaking News

ऊसाचे ५ कोटींचे पेमेंट सभासदांच्या बँक खात्यात वर्ग : पाटील


राहुरी वि. प्रतिनिधी - डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१७-१८ च्या गळीत हंगामातील दि. १ मार्च ते १५ मार्च या पंधरवाडयात गळीत झालेल्या ऊसाचे २ हजार रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे सुमारे ५ कोटी ७० लाख रुपयांचे पेमेंट सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची कामधेनू सुरु करुन आपला शब्द पाळला आहे. मात्र अनंत अडचणींना सुरुवातीपासून सामोरे जावे लागत आहे. जास्तीतजास्त ऊस गाळप करण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे. यावर्षी ऊस उत्पादक सभासद, कामगार यांनी केलेल्या सहकार्यामुळे कमीत कमी २ लाख २० हजारापर्यंत गळिताचा टप्पा गाठला आहे. पहिल्यापासूनच पारदर्शक कारभाराचा दिलेला शब्द सर्व संचालक मंडळ पाळत आहे. ऊस उत्पादक सभासदांनी मोठया विश्वासाने ऊस कारखान्याला दिला आहे. संचालक मंडळानेही या ऊसाचे पेमेंट लवकरात लवकर कसे अदा करता येईल, याकडे लक्ष दिले आहे. निसर्गाने साथ दिल्याने साखर उतारा उत्तम आला. उर्वरित पंधरवाडयातील ऊस उत्पादकांचे पेमेंट लवकरात लवकर वर्ग करण्यात येईल. तसेच उर्वरीत १०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे पेमेंट साखरेचा भाव वाढल्याबरोबर वर्ग करण्यात येईल. ऊस उत्पादक सभासदांच्या पदरी जास्तीतजास्त झुकते माप टाकून त्यांनी टाकलेल्या विश्वासास डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पात्र राहू.