Breaking News

जळगाव साबां अधिक्षकांच्या कारनाम्यांची चौकशी करण्याची मागणी

जळगाव/ विशेष प्रतिनिधी - नाशिक सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळात शासन पैसा देते आणि अधिक्षक अभियंता आणि त्यांचे तीन कार्यकारी अभियंता तो उधळतात, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ कारभार पारदर्शक सरकार या ब्रिदाला कलंक लागल्याची चर्चा आहे. दरम्यान लोकमानव संघटनेने या संदर्भात मुख्य अभियंता पगारे यांच्यासह बांधकाम मंत्री यांना तक्रार करून अधिक्षक अभियंता सोनवणे यांच्या कार्यपध्दतीची चौकशी करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः कामांचे तुकडे (स्पिल्ट अप)पाडून निविदा संहीतेचा भंग करणे, तसेच अनावश्यक उधळपट्टी करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे लोकमानवचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी लोकमंथनशी बोलताना सांगीतले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री असतांना जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता सोनवणे आणि कार्यकारी अभियंता पाटील, गायकवाड आणि परदेशी या चौघांनी शासकीय निधी खर्च दाखवून अपहार करण्यासाठी अनेक ठिकाणी अनावश्यक कामे प्रस्तावित केल्याचा आरोप लोकमानव संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी केला आहे. याविषयी लोकमंथनशी बोलतांना काही उदाहरणे दिली.
कैलास राऊत यांनी केलेल्या आरोपांनुसार बोदवड ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सत्र न्यायालय निवासस्थान किरकोळ दुरूस्ती, जळगाव जिल्हा कारागृह विशेष दुरूस्ती, शहर पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या कार्यालयातील दुरूस्ती, जिल्हा कारागृहातील शौचालयाचे बांधकाम, जामोद येथील खुले सभागृह अशी अनेक कामे आवश्यकता नसतांना तिन्ही कार्यकारी अभियंत्यांशी संगनमत करून अधिक्षक अभियंता सोनवणे यांनी प्रस्तावित केली. बोदवड ग्रामीण रूग्णालयाचा अपवाद वगळता अन्य सर्व कामे सुबे 3054 या लेखाशिर्षाखालील आहेत. बोदवड रूग्णालयाचे प्रस्तावित काम तीस लाखाचे असतांना नियमाप्रमाणे ई-निविदा करणे क्रमप्राप्त होती. तथापी या अटीला फाटा देता यावा म्हणून हे काम स्पिल्ट अप करण्याचे धाडस अधिक्षक अभियंता सोनवणे यांनी दाखवले. (क्रमशः)