Breaking News

भिवंडी पंचायत समिती बांधकामच्या निधीला लागला उंदीर

भिवंडी/ प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातही शासकीय निधीला कुरतडणार्‍या शाखा अभियंता पातळीवरील उंदरांचा सुळसुळाट झाल्याने विकास कामांना छिद्रे पडली आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या उंदरांना माध्यमातील सम्राट समजणारे काही बोक्यांचीही साथ लाभली आहे.

भिवंडी पंचायत समिती बांधकाम इवदचे शाखा अभियंता यांनी कुटील डाव खेळून उपविभागावर ताबा मिळवला आणि पात्र उपअभियंत्यांना सळो की पळो करून उपअभियंतापद गेली तीन वर्ष हायजॅक केले. या परिस्थितीचा फायदा लाटून शासकीय निधीची उधळपट्टी करण्यासाठी नाना क्लुप्त्या लढविल्या. भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम इवद अंतर्गत रस्ते, घरकुल, इंदीरा आवास आदी कामांसाठी निधी वितरीत केला जातो. भौगोलिक परिस्थितीमुळे ठाणे जिल्हा मुंबईच्या बगलेत वसला गेल्याने या जिल्हापरिषदेच्या विकासकामांचा समावेश एमएमआरडीएमध्ये झाला.त्याचा ठाणेकरांना खरेतर फायदा होणे अपेक्षित आहे. भिवंडी वगळता अन्य पंचायत समितींनी त्याचा फायदा घेतलाही. भिवंडीत मात्र शाखा तथा उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले दत्तु गिते यांनी एमएमआरडीए अंतर्गत मिळालेला निधी खर्च केला मात्र कागदावर. प्रत्यक्षात कामे केली नाहीत.जी कामे केली तीही दुय्यम दर्जाची. एका बाजुला कंत्राटदारांना देयके अदा करतांना शाखा अभियंता म्हणून दोन टक्के तर उपअभियंता म्हणून तीन टक्के अशी पाच टक्के दलाली घेतली तर दुसर्‍या बाजुला काही कंत्राटदारांच्या नावे काम केल्याचे दाखवून बोगस देयके अदा केली व मिळालेल्या देयक रकमेत कंत्राटदाराशी वाटेकरी झाले.
शाखा तथा उपअभियंता दत्तु गिते भिवंडी उपविभागात शासकीय निधीची मुक्तहस्ते उधळण करीत असतांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणविणारे काही माध्यम प्रतिनिधी मात्र माध्यमक्षेत्रात आपणच सम्राट असल्याचे भासवून दत्तु गिते यांचे भ्रष्ट कारनामे दडवण्यासाठी आपली उर्जा खर्ची घालत आहेत. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या माध्यम प्रतिनिधींच्या वाटेत गतीरोधक बनण्याचे पाप करीत आहेत. यावरून ही मंडळी देखील दत्तु गितेंच्या भ्रष्ट कारनाम्यात वाटेकरी असल्याची शंका घेण्यास वाव मिळतो. (क्रमशः)

ठाणे जिल्हापरिषदेत दत्तु गितेच्या कर्तृत्वाचे गुलछर्ये
दत्तु गीते...एक शाखा अभियंता तब्बल सोळा वर्ष एकाच ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे गुलछर्ये उधळत आहे. भिवंडी उपविभागात शाखा अभियंता असलेल्या या दत्तुकडे तीन वर्षापासून चक्क उपअभियंता पदाचा पदभार आहे. महाराष्ट्रात शेती दुष्काळाच्या सावटाखाली आहे असे ऐकले होते, पण बांधकाम विभागातही उपअभियंत्यांचा दुष्काळ पडला आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा परिषद प्रशासन दत्तु गितेवर एव्हढे मेहेरबान झाले का?
तीन वर्षात एकही लायक उपअभियंता मिळाला नाही म्हणून दत्तु गितेला भिवंडी उपविभाग आंदण दिला का?
सोळा वर्ष एकाच ठिकाणी सेवा देणारा दत्तु गिते आहे तरी कोण? सोळा वर्षात एकदाही बदलीच्या प्रक्रियेतून दत्तु गिते कसा सुटला? कोण आहेत दत्तु गितेचे पाठीराखे? कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनीही दत्तु गितेच्या प्रभावासमोर नांगी का टाकली? विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून ठाणे जिल्हा परिषदेत रूजू झाले असतांनाही विवेक भिमनवार दत्तु गितेला शरण का जातात?
नेमकी कुठल्या षडयंत्राची करणी केली दत्तु गितेंने? जिप प्रशासनाचे कुठले इंगीत आहे दत्तु गितेकडे? जिल्हा महसुल प्रशासनाचेही प्रपंच चालविण्याची ताकद असलेला या दत्तु गितेची कुंडली सादर करणारी लेखमाला...
उद्याच्या अंकात
दत्तु गितेच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती मैदानात उतरणार ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्र्यासह शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वावर दत्तु गितेला पाठीशी घातल्याचा आरोप दत्तु गितेंनी चहा दारूच्या मोबदल्यात पोसले माध्यमांमधील बोरू बहाद्दर दलाल पाच टक्क्यांसाठी दत्तु गितेंनी कशी केली हातचलाखी?