Breaking News

संवेदनशिलतेने माणुसकी जगविण्याचे कार्य अमृतवाहिनी करित आहे -डॉ.कांडेकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिना निमित्त आरोग्य क्षेत्रात सामाजिक भावनेने योगदान देणारे नेत्र तज्ञ डॉ.सुधा कांकरिया, ह्रद्यरोग तज्ञ डॉ.बापूसाहेब कांडेकर व स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रकाश टेकवाणी यांना सन्मान आरोग्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. एमआयडीसी येथील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजेश पेवाल, काकासाहेब मेडिकल फाऊंडेशनचे डॉ.जयंत शिंदे, प्राचार्य डॉ.रेगे, श्रीकांत बिल्ला आदिंसह काकासाहेब मेडिकल महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात दिपक पाटील यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने मानवसेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यावरील बेवारस मनोरुग्ण व मतिमंद बालकांसाठी करण्यात येणार्‍या कार्याची माहिती दिली. तसेच या संस्थेत पंचवीस मनोरुग्णांवर उपचार सुरु असून, पाचशेपेक्षा जास्त मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
डॉ.सुधा कांकरिया म्हणाल्या की, मनोरुग्णांना जेव्हा समाजासह कुटुंबदेखील वाळीत टाकतो. अशा मनोरुग्णांचे पुनर्वसन करिता अमृतवाहिनी संस्था देवदुताचे काम करीत आहे. मुलगी विना जग हे जिवंत राहू शकत नाही. माणुसकी नसलेले लोक स्त्री भ्रुणहत्येसारखे पाप करीत आहे. मुलीला वाचविण्याचा संकल्प हा जगाला वाचविण्याचा व मनुष्याचे असतित्व टिकविण्याचा संकल्प असल्याचे सांगून, मान कन्हैय्या ट्रस्टच्या वतीने या संस्थेस मदत करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. डॉ.प्रकाश टेकवाणी यांनी आरोग्य क्षेत्रात पंचवीस वर्ष सेवा देवून मानसिक समाधान मिळाला आहे. समाजाची परतफेड करण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. वैद्यकिय क्षेत्रात क्रांती झाली. मात्र डॉक्टरांची प्रतिमा डागवली आहे. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याप्रती असलेला विश्‍वास कमी होत चालला असून, याला काही मोजके लोक कारणीभूत आहे. चांगुलपणामुळे हे जग टिकले असून, माणुसकीचा संदेश त्यांनी दिला.
डॉ.बापूसाहेब कांडेकर म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात वास्तूस्थिती बदलत चालली आहे. स्वत:च्या व्यवसायाशी प्रमाणिक राहिल्यास अपयश येणार नाही. अमृतवाहिनी संस्थेचे काम पाहून मन गहिवरले आहे. संवेदनशिलतेने माणुसकी जगविण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. समाजसेवेने समाधान मिळते. नोबेल मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने या संस्थेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन, सहकार्य करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.
स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव करुन, उपस्थितांनी सामुदायिक शपथ घेतली. संस्थेचे संस्थापक सचिव दिलीप गुंजाळ यांनी पुरस्कार्थींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाबासाहेब सांगळे यांनी केले. उपस्थितांचे आभार अशोक चिंधे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलकर्णी सर, डॉ.संदेश बांगर, राजू पोटोळे, कैलास शिरसाठ, सिराज शेख, किरण वहाडणे, शैला तुपे, मच्छिंद्र दुधवडे आदिंनी परिश्रम घेतले.