Breaking News

हिरडगाव येथे महाराज यात्रा उत्सव


श्रीगोंदा तालुक्याच्या पुर्वेस नदीच्या तिरावर हिरडगावचे ग्रामदैवत नागनाथ महाराज यांचा सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव साजरा होत आहे.हिरडगावच्या वैभवात भर घालणारं अत्यंत सुंदर व देखणं मंदिर याठिकाणी पहावयास मिळते. अनेक दिवसांच्या परिश्रमातून गावकरी व तरुणांच्या प्रयत्नांतून एक टुमदार मंदिर विलोभनिय दिसत आहे. 

गुढिपाडव्याच्या दिवसापासून सर्व गावकरी यात्रेच्या तयारीला लागले आहेत. गावची यात्रा म्हटले की, सर्व ग्रामस्थांना, पाहुण्यांना, वेगळाच आनंद वाटतो. नवे कपडे, घरातील स्वच्छता याची लगबग सुरू होते. यात्रेसाठी देशाच्याकानाकोपर्‍यातून येण्यासाठी प्रत्येक गावकरी आतुरलेला असतो. देशसेवा करणारा सैनिकही याला आपवाद ठरत नाही. ग्रामदैवतांच्या यात्रेदिवशी सकाळी अभिषेक पार पडले, त्यानंतर शेरणीचा कार्यक्रम चार वाजेपर्यंत चालतो. (नारळ, पेढे, गुळ ) त्यानंतर गावकरी शंभो पार्वती, शिव हर हर महादेव अशा घोषणा देत सवारी डफडं व पिपाणी यांच्या सुमधुर तालावर निघते. नंतर आरती करून. यात्रेच्या पहिल्या दिवसाची सांगता होते.
 
संध्याकाळी देवाचा छबिना, शोभेची दारु व तसेच तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन पाहुण्या मंडळींकरीता केले जाते.दुसर्‍या दिवशी जंगी कुस्त्यांचा फड तसेच महिला व बालगोपाळ यांच्याकरीता बाजार भरविला जातो. त्यामध्ये मोठमोठे पाळणे, मिठाईची दुकाने, खेळण्यांची दुकाने थाटलेली असतात. 
अशी ही हिरडगावची यात्रा आनंदाची पर्वणीच असते.