Breaking News

रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी पांढरी शाडूमाती बांधकाम विभागाची काळझोप

अहमदनगर / प्रतिनिधी  - तालुक्यातील खडकी परिसरात मुरुमाऐवजी चक्क पांढर्‍या शाडूमातीचा राजरोस वापर होत आहे. मातीचा भराव करून तातडीने बुजवला जात आहे. नगर-दौंड रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम जेवढ्या वेगात सुरू आहे, तेवढेच ते निकृष्ट होत आहे. निकृष्ट काम सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे डोळेझाक करत आहे. 

नगर-दौंड राज्य महामार्गाचे हस्तांतरण केंद्र शासनाकडे करत या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. कायनेटिक चौक ते पुढे १२० किलोमीटर कुरकुंभच्या पुढे बारामती, पाटस रस्त्यापर्यंत रूंदीकरण होत आहे. १२ मीटर रूंदीचा हा रस्ता सिमेंटचा होणार आहे. या कामाचा ठेका गुजरातमधील राजकीय वरदहस्त असलेल्या बड्या ठेकेदाराकडे आहे. रस्त्याच्या मजबुतीसाठी उच्च प्रतीचा मुरूम वापरून योग्य प्रमाणात पाणी मारून मगच रोलिंग आवश्यक आहे. पण मुरुमाऐवजी पांढरी शाडूमाती टाकली जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कामाकडे फिरकतही नाही. अशा निकृष्ट कामामुळे या रस्त्याचे आयुष्यमान किती वर्षांचे असेल याबाबत शंकाच आहे. अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.