Breaking News

शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षते खाली टंचाई आढावा बैठक संपन्न !


शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत गावो गाव चे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, रेंगाळलेली जलयुक्त शिवार व जलसिंचनाची कामे, वीज, सार्वजनिक रस्ते, रोजगार हमीची कामे आदी रेंगाळलेल्या मुलभूत समस्या बाबत तक्रारीचा पाउस पडला. 

यावेळी विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी थातूर मातुर उत्तरे देऊन आली वेळ निभावून नेण्याचे काम केले. यावेळी आगाऊ सूचना देऊनही बैठकीत सहभागी झालेल्या विविध शासकीय विभागात समन्वयाचा अभाव दिसून आल्याने आमदारासह प्रांताधिकारी, तहसीलदार, आदींनी सर्वांनी मिळून टंचाईचा सामना करणे आवश्यक असताना जबाबदार अधिकारी अशाच पद्धतीने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणार असतील तर टंचाई आढावा बैठक काय कामाच्या ? असा सवाल करून आजच्या बैठकीतील तक्रारी बाबत तातडीने निपटारा झाला नाही तर संबंधितावर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल असा सज्जड दम भरला .यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उच्चांकी तापमानमुळे शेवगाव तालुक्यात आता पासूनच अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील चेडे चांदगाव, आखेगाव, बेळगाव, ठाकूर पिंपळगाव, शोभा नगर, मुरमी, बाडगव्हाण आदी गावात टंचाई ची तीव्रता वाढत आहे. अनेक गावात हातपंप नादुरुस्त आहेत. शहर टाकळी व चोवीस गावच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकबाकीच्या कारणावरून दीर्घकाळ बंद आहे.

नागलवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेच्या पाझरतलाव, नवीन साठवण बंधारा आदी रेंगाळलेल्या कामांना चालना देण्याची मागणी करण्यात आली. खरडगाव येथील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट दिवे रात्रंदिवस सुरु आहेत. या बाबत माहिती देऊनही कार्यवाही होत नाही. शोभानगर येथील वीज पुरवठा केबल वायर जळाल्याने सध्या बंद आहे. गावात हरीनाम सप्ताह सुरु असल्याने तातडीने वीज पुरवठा सुरु व्हावा. अनेक गावात सार्वजनिक रस्त्याची दुरवस्था झाल्याने जरी टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला. तर गावात टँकर येण्यास अडचणी येणार असल्याने याबाबत रस्ता दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावी. टंचाई सदृश्य गावातील अनधिकृत पाणी उपशाबाबत संबंधितावर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा अशी मागणी नोंदविण्यात आली. लोकांच्या तक्रारी नंतर संबंधित यंत्रणेस जाग येते व धावपळ करूनही अडचणी सुटत नसल्याने टंचाई आढावा बैठकीचा सोपस्कार कशासाठी ? कामात कुचराई करणार्‍यावर कारवाई करून जनतेच्या अडचणीला न्याय देण्याची एकमुखी 
मागणी करण्यात आली. 

या बाबत येत्या चार पाच दिवसात निर्णायक कार्यवाही करण्याचे तसेच या बाबत चाल ढकल करणार्‍याचा अहवाल जिल्हास्थरावर देण्याचे आदेश संबंधितानी यावेळी दिले. प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यात पहिल्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवणार्‍या 18 गावे व 54 वाड्या वस्त्यासाठी सुमारे 28 लाख रुपये खर्चाच्या टंचाई आराखडा प्रस्तावाची माहिती दिली. त्यात टंकर द्वारे पाणी पुरवठा, विहीर अधिग्रहण, नवीन विंधन विहीर व कायम स्वरूपी उपाय योजनांचा समावेश असल्याची माहिती दिली. प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार दीपक पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, शहराध्यक्ष रवी सुरवसे, सुनील रासने, दिनेश लव्हाट, भीमराज सागडे, वाय.डी. कोल्हे, संजय वडते, शेषराव 
वंजारी, पांडुरंग तहकिक, माजी जि.प.सदस्य सौ कमल खेडकर, यांच्या सह विविध शासकीय विभागांचे खाते प्रमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला. आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांनीसूत्रसंचालन केले.