एप्रिल फुल मुळे पाथर्डीत तणाव
पाथर्डी शहरातील लालशेठ चोरडीया या व्यापार्याने एप्रिल फुल करण्याच्या नादात स्वतःचाच पायावर धोंडा पाडून घेण्याची घटना घडली असुन त्यानंतर काही वेळ पाथर्डी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर फिर्यादी महिलेला (रा. डांगेवाडी शिवार, शिरसाठ मळा ता. पाथर्डी) फोन करून तुझ्या नवर्याचा अपघात झाला असुन तो जागीच ठार झाला आहे.ही खोटी माहिती दिली असता फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरुन अदखलपात्र गुन्हाची नोंद पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे .
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, एका महिलेला (रा.डांगेवाडी शिवार) यांच्या पत्नीला काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चोरडिया यांनी फोन करून एप्रिल फुल करण्याच्या नादात तुमच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. यानंतर पत्नीने नातेवाईकांना फोनवर माहिती देऊन बोलावून घेतले. व खात्री केली असता हा प्रकार खोटा असल्याचे लक्षात आले. याचा जाब विचारण्यासाठी महिलेचा पती व नातेवाईक चोरडिया यांच्या दुकानात गेले असता यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली असल्याची माहिती फिर्यादीत दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून लालशेठ चोरडिया यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दुकानात वादावादी झाल्यानंतर काहीकाळ पेठेतील दुकाने बंद झाली होती.मात्र त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल नवगिरे, डोळस, नगरसेवक प्रसाद आव्हाड, नितीन गटानी, संदीप काकडे, फारूक शेख यांनी पेठेत जात व्यापार्यांना काही झाले नाही घाबरू नका असा धीर देत दुकाने चालू करण्याचे आवाहन केले. तर शहरात काही काळ भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते..