Breaking News

पियूष गोयल यांच्या कंपनीच्या नफ्यात तीन हजार पटींनी वाढ ?

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची मालकी असलेल्या कंपनीच्या नफ्यात तब्बल तीन हजार पटींनी वाढ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याप्रकरणी पियूष गोयल यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.यामुळे गोयल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, गोयल कुटुंबाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीत चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे. पारेख म्हणाले, पंतप्रधान मोदी हे विश्‍वासार्हतेवर बोलत असतात. मात्र, ते गोयल कुटुंबीयांच्या गुंतवणुकीवर शांत आहेत. जी त्यांनी सार्वजनिक केलेली नाही. पियूष गोयल यांच्या पत्नी सीमा गोयल यांची मालकी असलेली एक कंपनी केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून सुरू करण्यात आली. यानंतर अवघ्या 10 वर्षात या कंपनीचा नफा 30 क ोटी रुपयांवर पोहोचला. हे अगदी जय शहा मॉडेल च्या गुंतवणुकीसारखेच झाले आहे. ज्याच्या कंपनीचा टर्नओव्हर मोदी सरकारच्या काळात सतत वाढतच गेला, असे काँग्रेसने म्हटले आहे.
पियूष गोयल यांची पत्नी सीमा गोयल यांची मालकी असलेल्या इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 2005- 06 मध्ये फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक करुन सुरु करण्यात आली. अवघ्या 10 वर्षात या कंपनीचा नफा 30 कोटी रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे कंपनीचे उत्पन्न कशातून मिळते, याबाबत नेमकी माहिती देण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला. याशिवाय शिर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या राकेश अग्रवाल आणि मुकेश बन्सल यांच्याशी देखील पियूष गोयल यांची जवळीक आहे. या दोघांनी बँकेचे जवळपास 650 कोटी रुपये थकवले, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
पियूष गोयल 2014 पर्यंत इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. मे 2014 मध्ये केंद्रात मंत्रिपदी संधी मिळताच त्यांनी कंपनीचा राजीनामा देत त्यांच्याकडील शेअर्स पत्नीच्या नावावर केले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मोदी सरकार पारदर्शक कारभाराचा दावा करते. पण त्यांच्या दाव्यांची आता पोलखोल होत आहे, असा आरोप त्यांनी केला.