Breaking News

मागणी थंड, आवक वाढल्याने दर घसरले


सोलापूर, चालू हंगामात वारंवार तयार होणार्‍या अवकाळी ढगाळ वातावरणामुळे कलिंगड, खरबूजसारख्या थंडावा देणार्‍या फळांची मागणी कमालीची घटली आहे आणि दुसरीकडे आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान होत असून, त्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघत नसून या स्थितीमुळे फळविक्रे त्यांतही निराशा पसरली आहे. 

उन्हाळा म्हटलं की जागोजागी दिसतात ते कलिंगड, खरबूजसारख्या फळांचे स्टॉल आणि लज्जतदार, थंडगार कलिंगड व खरबुजाच्या फोडी विकणारे फेरीवाले. उन्हाळ्यात या फळ पिकांना मागणी असल्याने उत्पादक शेतकरी आणि विक्रेते यांना चार पैसे मिळण्याची शक्यता असते. यावर्षी उन्हाळा चालू झाल्यापासून वातावरणात कायम बदल होत असून वारंवार अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन थंड खाद्याची मागणी घटत आहे. परिणामी बाजारात कलिंगड, खरबूज याचे दर पडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत दर निम्म्याने असल्याची माहिती मिळत आहे. मागणी थंडावल्या मुळे विक्रेत्यांचाही मोठा तोटा होत आहे.