Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीचे पडसाद; मर्ढे येथील 10 एकर ऊस जळून खाक

सातारा, दि. 22 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील मर्ढे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या नंतर झालेल्या तणावाच्या वातावरणानंतर येथील सुमारे 10 एकर  उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावातील तणावामध्ये आनखी वाढ झाली होती. या घटनेमध्ये सुमारे 13 शेतकर्‍यांचे नुकसान  झाले आहे.
मर्ढे ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच झाली. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मर्ढे गावातील गोवे रानात व हिंगण शिवारातील चौकात धुराचे लोट  दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पाहून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. शेतकर्‍यांनी  आग आटोक्यात आणण्याची प्रयत्न केले. मात्र उसाचे बहुतेक क्षेत्र आगीत जळून खाक झाले आहे. गावामध्ये या घटनेची माहिती पसरल्यानंतर बहुतेक  ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिस व महसूल प्रशासनालाही दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ऊस जाळण्याची घटना घडली असल्याची चर्चा आहे. या  घटनेत सुमारे 13 शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. यामध्ये विजय शिंगटे, नारायण शिंगटे,  पुनीत जाधव, पद्मावती वाघमळे, सुहास शिंगटे, तुकाराम शिंगटे, संतोष शिंगटे, शिवाजी शिंगटे, सुरेश शिंगटे, बाळासाहेब भवर, रमेश भवर व अन्या दोन  शेतकर्‍यांचा समावेश आहे.