Breaking News

निळवंडे’चे कालवे पूर्ण करुन पाणी देणे हाच ध्यास : आ. थोरात कोपरगांव शिर्डीला नाशिकमधून पाणी द्यावे


संगमनेर प्रतिनिधी - अनेक अडचणींवर मात करीत निळवंडे धरण पूर्ण केले. अनेकांनी अडथळे आणले. आज अनेकजण निधी आल्याच्या घोषणा करीत आहेत. मात्र कालवे कामात कोणीही राजकारण आणू नये. शिर्डी आणि कोपरगांवसाठी नाशिकच्या धरणातून पाणी द्यावे. तळेगांवपट्ट्यासह दुष्काळी भागाला कालवे पूर्ण करुन लवकरात लवकर पाणी देणे, हाच ध्यास आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

तालुक्यातील चिंचोली गुरव येथे पश्‍चिम भाग सहकरी सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर रामदास वाघ, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, बाबा ओहोळ, अविनाश सोनवणे, हौशिराम सोनवणे, साहेबराव गडाख, भारत मुंगसे, सरपंच प्रमिला बर्डे, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी, शाखाधिकारी चांगदेव ढेपे, चेअरमन प्रकाश सोनवणे, उपसरपंच संपतराव सोनवणे, व्हा. चेअरमन गोरक्षनाथ सोनवणे, योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, निळवंडे धरणासाठी आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न राबविला. या कामी मधुकरराव पिचड यांनी मोलाची साथ दिली. निळवंडे धरणाचे अनेक शत्रू आहेत. आपण प्रामाणिकपणे हे धरण पूर्ण केले, कौठे कमळेश्‍वर, पिंपळगांव कोंझिरा या मोठ्या बोगद्यांसह काही भागात कालव्यांचे काम पुर्ण केले. मंत्रीमंडळात असतांना सतत आग्रह धरुन निळवंडेसाठी निधी मिळविला. 

अगदी २०१४ च्या शेवटी १०० कोटी निधी आणला. मागील ४ वर्षांत १ रुपायाचाही निधी या धरणाला मिळाला नाही. आता निवडणुका आल्याने निधीच्या घोषणा सुरु झाल्या आहेत. दुष्काळी भागाला निळवंडे धरणाचे पाणी देणे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी सर्वांनी मतभेद विसरुन एकत्र या. 

कोपरगांव शिर्डीला पाणी नेण्याची मागणी आहे. हे कोणते पाणी नेणार आहेत. यांच्यासाठी नाशिक धरणावरील पाणी आरक्षित आहे. तेथून त्यांनी पाणी न्यावे. आता एकवटून संघर्ष करु. येथील जनतेला सत्य माहित आहे. मात्र काही मंडळी मने दुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे निळवंडे धरणात योगदान काय, असा प्रश्‍न त्यांना जनतेने विचारावा. निळवंडे हा तळेगांव पट्टा व जिल्ह्याचा विषय आहे. 

या भागाला पाणी देण्यासाठी आपण काहीही करु. दि. १७ ला यासाठी होणार्‍या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. डॉ. तांबे यांनी मोगल व्यक्त केले. ते म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात कालव्यांची कामेही प्रामाणिकपणे मार्गी लावत आहेत. मात्र काही मंडळी जनतेला खोट्या भूलथापा देत आहे. त्यांना त्यांचे काम विचारा, केंद्र व राज्य सरकार हे थापाडे सरकार आहे. राज्यतील सहकार, शेतकरी, शिक्षण व्यवस्था उद्धवस्त करण्याचा सरकारचा डाव आहे. 

यावेळी लक्ष्मण गोडगे, साहेबराव कहांडळ, राजेंद्र कहांडळ, सूर्यभान सोनवणे, दगडू सोनवणे, त्र्यंबक गायकवाड, आनंदराव सोनवणे, व्ही. के. सोनवणे, शत्रुघ्न मुंगसे, सुरेश गोडगे, अनिल आभाळे, पुंजाहरी सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, जयश्री सोनवणे, तुकाराम पवार, अशोक गोडगे, सावळेराम गोडगे, यमाजी गोडगे, जयराम गोडगे आदी उपस्थित होते. प्रारंभी अविनाश सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सचिन आभाळे यांनी आभार मानले.