एस. टी. डेपोबाबत आश्वासनांचेच हेलपाटे! पालकमंत्री फिरवताहेत दिलेला शब्द
सध्याचे लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी निवडणुकीच्या दोन्हीही वेळेला कर्जत येथे एस. टी. डेपो करण्याचा जनतेला शब्द दिला होता. गेल्या दहा वर्षोंतसुद्धा पालकमंत्री शिंदे यांनी अनेकवेळा डेपोविषयी आश्वासने दिली आहेत. तसेच कर्जत येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये गेल्या तीन आठवड्यापूर्वी प्रा. शिंदे यांनी पंधरा दिवसांत कर्जतला एसटी डेपो मंजूर करू, असा विश्वास हजारो लोकांमध्ये दिला होता. परंतू त्यानंतर पंधरा दिवसांनी शिंदे यांनी शब्द फिरवून कर्जतला एसटी डेपो मंजूर न करता कर्जत बसस्थानक नुतनीकरणासाठी २ कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. सांगीतले असून ना. राम शिंदे यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला आहे, असेच म्हणावे लागेल. कारण एसटी डेपोची कर्जतकरांची मागणी आहे ती मागणी पूर्ण न करता मुळ प्रश्नाकडे दूर्लक्ष करण्यासाठीच नूतनीकरणासाठी फक्त २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. असे सांगून त्यांनी एसटी डेपो बाबतच्या प्रश्नाला पुन्हा एकदा बगल दिली आहे. प्रा. शिंदे यांनी एसटी डेपोबाबत कर्जतच्या हजारो लोकांची धूळफेक करत मोठी फसवणूक केलेली आहे़. नामदार राम शिंदे यांनी हजारो लोकांत दिलेला शब्द का फिरवला ? याबाबत मात्र स्वतः मंत्रीमहोदय अथवा त्यांचे कार्यकर्ते उत्तर देण्यास तयार नाहीत. याउलट बसस्थानकासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले, कसा शब्द पाळला ! म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून ते घेत आहेत.
