Breaking News

भाजपकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचेच काम - आ.थोरात

साखर कारखानदारीत रात्रंदिवस अनेक चाके फिरत असतात. अनेक लोक राबत असताना १७५ दिवसांचा हंगाम निर्विघ्नपणे पार पडला असून विक्रमी ११ लाख ४१ हजारांचे गाळप केले आहे. ऊस हेच शाश्­वत ठरणारे पिक असून सध्या भाजप सरकारकडून सहकार व सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरु असल्याची टिका राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१७-१८ या वर्षीच्या गळीत हंगामाची सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी आ. थोरात म्हणाले कि, यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने ऊस उत्पादन वाढले. येथे साखर उतारा ही ११.४८ इतका मिळाला. १७५ दिवस कारखाना निर्विघ्नपणे चालला यात परमेश्­वराचे आशिर्वाद, शेतकऱ्यांचे कष्ट, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी मजूर या सर्वांचे मोठे योगदान आहे. ३० मेगावॅट विज निर्मितीतून कारखान्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे. काटकसर व गुणवत्ता कायम जपताना चांगला भाव शेतकऱ्यांना दिला आहे.