Breaking News

सातारा जिल्ह्यात वर्षभरात 119 विवाह नोंदणी पध्दतीने

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : सततची दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई व नोटाबंदीमुळे लग्न खर्च आवाक्याबाहेर जात आहे. यावर उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील नवयुवक व युवतींचा नोंदणी पध्दतीने विवाह करण्याकडे कल वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी जिल्ह्यातील सहायक दुय्यम निबंधक अधिकारी, विवाह नोंदणी कार्यालयात लग्नसराईत आजपर्यंत तब्बल 119 नोंदणी विवाह झाले आहेत.
विवाह कार्यात अनावश्यक खर्चाचे प्रमाण जास्त असते. ’लग्न एकदाच होते’ असे समजून अनेकजण तुफान खर्च करतात. मात्र पुन्हा हा खर्च डोईजड होतो. काही वेळा एका बाजूकडील लोकांची खर्च करण्याची मानसिकता नसते. मात्र दुसर्‍या बाजूची खर्च करण्याची इच्छा असल्याने एकाची फरफट होत असते. आता त्याला हळूहळू फाटा दिला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात दरवर्षी नोंदणी विवाह करणार्‍यांचे प्रमाण वाढले असल्याचे नोंदणी कार्यालयातून सांगण्यात आले.
विवाह नोंदणी कार्यालयात होणार्‍या लग्नांची संख्या वाढत असल्याने कार्यालयास अनेकदा मंगल कार्यालयाचे स्वरुप प्राप्त होत आहे. कार्यालयातच वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने हे विवाह होत असतात. नोंदणी विवाहाची पध्दत अतिशय सोपी असून नाव नोंदणीसाठी वधू-वरांनी एक महिना अगोदर कार्यालयाशी संपर्क करावा लागतो. वधू-वरांचे ओळखपत्र व जन्मतारखेचा पुरावा आवश्यक असतो. प्रत्यक्ष विवाहावेळी दोन साक्षीदार आणावे लागतात.
नोंदणी पध्दतीने विवाह होत असल्यामुळे वधू व वर पक्षाकडील पैशाची बचत होऊन इतर नातेवाईकांच्या वेळ व पैशाची बचत होते. वधू-वर दोघेही जिल्ह्यातील असल्यास नोटीस शुल्क 50 रुपये, तर विवाह नोंदणी शुल्क 150 रुपये आणि जोडप्यातील एकजण परजिल्ह्यातील असल्यास नोटीस शुल्क 100 आणि विवाह नोंदणी शुल्क 150 रुपये असून एक महिन्याचा नोटीस कालावधी आणि त्यानंतर 60 दिवस लग्नासाठी कालावधी असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.