Breaking News

सराला ग्रामपंचायतच्या प्रियंका रोकडे यांचे सरपंचपद रद्द

श्रीरामपूर प्रतिनिधी - तालुक्यातील सराला ग्रामपंचायतच्या सरपंच प्रियंका जनार्दन रोकडे या सासू, सासरे व पती समवेत शासकीय गायरान जागेत अतिक्रमण करुन राहत असल्यामुळे तसेच त्या ठिकाणी शेती करीत असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी रद्द केले आहे. या संदर्भात रोकडे यांच्या विरोधी उमेदवाराचे पती सखाहरी पिरताबा मोहन यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे 10 ऑगस्ट 2017 रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला होता. त्याची चौकशी होवून निकाल लागला आहे. सराला ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे .श्रीरामपूर तालुक्यातील सराला ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी सन 2015 साली निवडणूक झाली होती. सदर निवडणूकीत सदस्यपदाच्या निवडणूक अर्जामध्ये विद्यमान सरपंच रोकडे यांनी त्यांचे सासरे खंडू भिवा रोकडे यांच्या गट नं.14 मध्ये राहत असल्याचा तसेच त्या जागेत असलेल्या शौचालयाचा वापर करीत असल्याचा दाखला जोडलेला होता. या संदर्भात त्यांच्या विरोधी उमेद्वाराचे पती सखाहरी मोहन यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे सदर निवडून आलेल्या सदस्या या शासकीय गायरान जागेत राहून त्यांनी अतिक्रमण केले असल्याचा तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांचे सासू, सासरे व पती हे सर्व कुटूंब सदर जागेत राहून त्या ठिकाणी असलेली शासकीय जमीनीमध्ये शेती करीत असल्याचे पुराव्यासह सादर केले होते. त्यामुळे सराला ग्रामपंचायतच्या सरपंच व त्यांचे कुटूंब एकत्रित असून ते अतिक्रमण असलेल्या शासकीय जागेमध्ये राहून शेती करीत असल्याचे स्पष्ट झाले. सरपंच रोकडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3)चा भंग केला असल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी पारित केला आहे. त्यामुळे प्रियंका रोकडे यांचे सदस्यत्व व सरपंच पद रद्द झाले आहे. या निकालामुळे श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अर्जदार सखाहरी मोहन यांच्यावतीने औरंगाबाद खंडपीठाचे अ‍ॅड. बालाजी येणगे यांनी काम पाहिले.