Breaking News

गायक अच्युत अभ्यंकर यांचे निधन

मुंबई, दि. 11, एप्रिल - विख्यात शास्त्रीय गायक अच्युत केशव अभ्यंकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. अभ्यंकर किराणा घराण्याचे गायक होते. कैलासवासी पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच देश विदेशांत असंख्य मैफिली सादर करुन नावलौकीक प्राप्त केला. कला आणि संगीताचे वरदान असलेल्या ठाणे शहरात आजवरच्या कारकीर्दीत अनेक मात्तबर प्रतिथयश गायक, संगीतकार नावारुपाला आले. त्यातील एक म्हणजे शास्त्रीय गायक अच्युत केशव अभ्यंकर. आपले गुरु कै. पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन श्री. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले आहे.