विरोधकांकडून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न
मोतिहारी/वृत्तसंस्था, दि. 11, एप्रिल - सर्वोच्च न्यायालयाच्या एससी/एसटी अॅट्रॉसिटी कायद्यावरील निर्णयाचा देशभरात निषेध करण्यात आला. यामागे देशात फूट पाडण्याचा विरोधकांचा हेतू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. महात्मा गांधी यांच्या चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त आयोजित स्वच्छताग्रहींच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान बोलत होते. ते (विरोधक) रस्त्यापासून संसदेपर्यंतच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करत आहेत. आज तुमच्याकडे असे शासन आहे जे देशातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु विरोधक लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार वरिष्ठ अधिकार्यांची परवानगी असेल तरच सरकारी अधिकार्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई होणार आहे. तसेच अटकपूर्व जामीन मिळविण्यास देखील मुभा असणार आहे. सामान्य नागरिकांच्या बाबतीत वरिष्ठ पोलीस अधिकार्याने (एसएसपी) परवानगी दिल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी 2 एप्रिलला झालेल्या निदर्शनांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडून 8 जणांचा मृत्यू झाला व डझनहून अधिक लोक जखमी झाले. विरोधक गरिबांना सामर्थ्यवान बनताना बघू शकत नाहीत. गरीब लोक समर्थ झाले तर त्यांना (विरोधकांना) खोटे बोलणे शक्य होणार नाही. गरिबांना मूर्ख बनवणे शक्य होणार नाही, असे सांगत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मोतीझील प्रकल्प, बेट्टिआह नगर परिषद पाणी पुरवठा योजना व चार गंगा प्रकल्पांचा समावेश आहे.