Breaking News

देवदैठण येथे सर्पमित्रांकडून विषारी नागास जीवदान


श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे सलग दोन दिवस एकाच ठिकाणी दिसणार्‍या अतिविषारी नागास सर्पमित्रांकडून जीवदान मिळाले. येथील रहिवाशी मच्छिंद्र बनकर यांच्या घराच्या भिंतीजवळ दुपारी व सायंकाळी दोन वेळा साप दिसला. घरातील महिला घाबरून गेल्या. त्यानंतर बनकर व सहकार्‍यांनी शोध घेईपर्यंत साप निघून गेला. दुसर्‍या दिवशी पुन्हा तोच साप फना काढून बसलेला दिसला. त्या सापास न मारता शिरुर (जि. पुणे) येथील सर्पमित्र निलेश पाठक यांना संपर्क केला. काही वेळातच सर्पमित्र समीर शहा व योगेश परदेशी यांनी त्या ठिकाणी येऊन घराभोवती असणार्‍या अडगळीच्या जागा वा बीळाच्या ठिकाणी शोध घेतला. त्याच ठिकाणच्या बिळात साप असल्याचे त्यांना आढळून आले. अगदी शिताफीने परदेशी यांनी नाग पकडला. साडेतीन ते चार फूट लांबी असलेला विषारी नाग पकडताच बनकर यांच्या घरच्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. सर्पमित्र शहा यांनी हा अतिविषारी भारतीय नाग( स्पेक्टिकल कोब्रा) असून शहर वा गावच्या ठिकाणी पाणथळ जागा, दगड वा वीटांच्या ढिगार्‍यांत आढळून येतो. सध्या वातावरणातील अति उष्णतेमुळे गारव्याच्या ठिकाणी तसेच बेडूक, पक्षी, त्यांची पिल्ले वा अंडी खाण्यासाठी अन्नाच्या शोधार्थ सर्प हे घराभोवती वा मानव वस्तीत आढळून येत असल्याने घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे सांगून सापांविषयीचे गैरसमज दूर करताना साप दिसताच त्यास न मारता सर्पमित्राला कळवा व जीवदान द्या असे आवाहन केले.