Breaking News

आ. थोरातांमुळे आदिवासींच्या जीवनात सोन्याची पहाट!


संगमनेर प्रतिनिधी - पहाटेच झोपेतून लवकर उठायचे आणि दिड किलोमीटर अंतरावर डोंगरदर्यात असणारया विहिरीवर पिण्याचे पाणी आणयासाठी जायचे. चालण्यासाठी धड रस्ता नसतानाही अशा कठीण परिस्थितीत डोक्यावर दोन दोन हांडे घेऊन पाणी आणायचे. अशावेळी दगड धोंडयांना ठेचकाळून बोटेही फुटत होती. मात्र तब्बल ७० वर्षांनी ‘त्यांच्या’ जीवनात सोन्याची पहात उगवली. ही काही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. तर माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून झालेला चमत्कार‘ आहे. आ. थोरातांमुळे तालुक्यातील गारोळे पठार आदिवासी समाजातील महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष संपला आहे. 

कुरकुंडी गावच्या उंच डोंगरावर गारोळे पठार ही आदिवासी वाडी वसलेली आहे. जवळपास तीनशे ते चारशे लोकसंख्या या वाडीची आहे. याठिकाणी पाण्याची कुठल्याच प्रकारे सोय नसल्याने येथील सर्व सामान्य आदिवासी लोकांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्षांपासून येथील महिला व पुरुषांना बाहेरगावी जावे लागत आहे. त्यातच वाडीपासून दिड किलोमीटर अंतरावर डोंगर दर्यात असणारया पाणी पुरवठा विहीरीवरून पाणी आणावे लागत असे. मात्र पाईपलाईनचे पाणी थेट या वाडीत आल्याने नागरिकांनी ढोल ताश्यांच्या गजरात या पाण्याचे स्वागत केले. बोरबन गावचे सामाजिक कार्यकर्ते व साईरत्न प्रतिष्ठानचे सुरेश गाडेकर, संदेश गाडेकर या बंधूनी काही महिन्यांपूर्वी मालपानी परिवाराच्या माध्यमातून उत्कृष्ट असे पाईपलाईनचे काम करून घेतले होते. त्यामुळे आदिवासी महिलांनी आनंदोत्सवही साजरा केला होता. परंतु विजजोड नसल्याने पाईपलाईन सुरु नव्हती. विजजोडणीचे काम व्हावे, यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले आदींनी पाठपुरावा ही केला. पण काहीच उपयोग झाला नाही. राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या पुढे ही ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या आणि खर्‍या अर्थाने कामाला सुरूवात झाली. यामध्ये ग्रामपंचायतीचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी व बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य व पशुसंवरधन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी खर्‍या अर्थाने या कामाला चालना दिली. विज वितरण कंपनीच्या माध्यमातून चार ते पाच दिवसांत विजेचे खांबही उभे राहिले. विजजोडणीही करण्यात आली. दरम्यान, कालचा रविवार {दि. १५} गारोळे पठार आदिवासी लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सोन्याची पहाट घेऊन आला. 

काल {दि. १५} सकळै थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ आरगडे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, कैलास शेळके, शिवाजी शेळके, बशीर चौगुले, संदीप सांगडे, अकलापूर गावचे उपसरपंच संदीप आभाळे, बोटा गावचे सरपंच विकास शेळके, सुहास वाळूंज, बाळासाहेब शेळके, रमेश आहेर आदींच्या हस्ते या पाण्याचे पूजन करण्यात आले.

आ. थोरातांमुळेच ‘अच्छे दिन’ 

यावेळी आयुष्याच्या अर्ध्या वळणावर पाण्यासाठीचा संघर्ष संपल्याची प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केल्या. तर पाण्यासाठी खूप वर्षे वाट पहावी लागली. निम्मे आयुष्य पाणी आणण्यातच गेले. इतक्या वर्षांनंतर आता कुठे आम्हाला सुखाचे दिवस आले आहेत. आ. थोरातांमुळेच आम्हाला हक्काच्या पाण्यामुळे ‘अच्छे दिन’ पहायला मिळाले. 

किसन खेमा जाधव, गारोळे पठार.