Breaking News

नगरसेवकाच्या घरात घुसून मुलास मारहाण


संगमनेर/प्रतिनिधी - नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलीप पुंड यांच्या घरात घुसुन कार्तिक बाबूराव जाधव आणि पुंड यांचा मुलगा स्वप्नील यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सुमारे ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी कार्तिक बाबूराव जाधव (वय २४, रा. जनता नगर, संगमनेर) याने फिर्याद दिली. शुभम उर्फ लाल्या राहाणे, साया शिंदे, गणेश बेलापूरकर, अभिजीत राहाणे, राजू कानवडे, विकास आव्हाड, त्रषि गिरी, अनिल गायकवाड, लखन शिंदे, शुभम शिंदे, सुरज जगताप आणि संगमनेरातील इतर १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात आरोपी असलेल्या शुभम राहाणे याचा चुलत भाऊ अक्षय राहाणे यांच्या लग्नासाठी कार्तिक जाधव हा आणि त्याचे मित्र स्वप्नील पुंड, प्रथमेश सुरेश सातपुते हे सिन्नर येथे गेले होते. लग्न आटोपून जाधव हा शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रांसमवेत माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलीप पुंड यांच्या घरी गेला होता. त्यावेळी प्रथमेश सातपुते हा घुलेवाडी येथे काही कामानिमित्त गेला असता त्याच्या मागे दहा ते बारा मोटारसायकलवरील आरोपी त्याला मारण्यासाठी मागे लागले. सातपुते हा घाबरून पुंड यांच्या घरी आला. आरोपींनी थेट नगरसेवक पुंड यांच्या घरात घुसत त्याला मारहाण सुरू केली. जाधव व पुंड यांनी त्यास मारहाण करणारांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला असता जाधव व नगरसेवक पुंड यांनाही शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस हेड कॅा. ईस्माईल शेख तपास करीत आहेत.