Breaking News

‘चला हवा होऊ द्या’मध्ये कोपरगावकर खळखळून हसले!

कोपरगाव ता. प्रतिनिधी - प्रसिद्ध विनोदवीर भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची अफलातून ‘कॉमेडी’, श्रेया बुगडेंची अदाकारी, भारत गणेशपुरे, विनीत भोंडे, अतुल तोडणकर यांचे अफलातून विनोद, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना ‘वाजले की बारा’ फेम अमृता खानविलकर यांचे बहारदार नृत्य या विविधांगी कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. हास्यविनोदांनी तमाम कोपरगावकर अक्षरशः खळखळून हसले. निमित्त होते प्रसिद्ध अशा ‘चला हवा होऊ द्या’ कार्यक्रमाचे.

माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कोपरगावच्या इतिहासात या कार्यक्रमाने प्रथमच गर्दीचा उच्चांक गाठला गेला. जवळपास ३० ते ३५ हजार रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

सालाबाद प्रमाणे याहीवर्षी माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर असलेल्या काळेंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली वाहण्यात आली. सायंकाळी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर जयंतीनिमित्त ‘चला हवा होऊ द्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या व साता समुद्रापार जाऊन पोहोचलेल्या मराठी प्रेक्षकांसह हिंदी भाषिक प्रेक्षकांना खळखळून हसविणारा 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले. ‘माझ्या नव-याची बायको’ फेम गुरु अर्थात अभिजित खांडकेकर यांनी कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर सी. सी. टी. व्ही.च्या निगराणीखाली ठेवण्यात आला होता. महिलांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी उपस्थित असणा-या सर्वच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सर्वच्या सर्व खुर्च्या पूर्णपणे भरल्यामुळे हजारो रसिकांनी उभे राहून तर काही रसिकांनी इमारतीच्या गच्चीवरून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमस्थळी पाय ठेवण्यासही जागा नव्हती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. कार्यक्रमाला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात हातभार मिळाला. कार्यक्रमासाठी अलोट गर्दी होऊनही उत्कृष्ट नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी उपस्थित असणा-या पोलीसांनीही कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.