Breaking News

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अनिल लोखंडे द्वितीय क्रमांकाचे मानकरी

महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणामार्फत प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांचेकडे असलेल्या नवनवीन कल्पना, संबोध, क्लुप्त्या यांचा वापर व विकास अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि.28 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र राज्य विदया प्राधिकरण, पुणे येथील महात्मा फुले सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विदया प्राधिकरण पुणे व बालभारती मंडळ पुणे चे संचालक डॉ. सुनिल मगर, एससीइआरटी चे सहसंचालक डॉ. विकास गरड, सहसंचालिका डॉ. नेहा बेलसरे व उपसंचालिका सुजाता लोहकरे, डॉ. गीतांजली बोरुडे (संचालक-विद्या प्राधिकरण संशोधन विभाग कक्ष ) यांचे हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी एससीइआरटीचे इतर पदाधिकारी, प्रशासनाधिकारी कुर्‍हाडे, नवोपक्रमाचे परीक्षक व ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेश बनकर, डॉ. ज्ञानेश्‍वर पाटील, डॉ. विजय शिंदे आदी मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये अनिल किसन लोखंडे - गणित व विज्ञान विषयाचे उपक्रमशील माध्य. शिक्षक, प्रवरा माध्यमिक विद्यालय गळनिंब, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांनी माध्य व उच्च माध्य, मुख्याध्यापक गटातून सादर केलेल्या इ. 8 वी, 9 वी. व 10 वी. करिता उपयुक्त - कला व कृतीयुक्त भूमिती या नवोपक्रमाला संपूर्ण राज्यातून द्वितीय क्रमांक मिळाला. व नवोपक्रम बक्षीसास पात्र ठरला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदरचा उपक्रम नक्कीच राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना भूमितीचे अध्यापनासाठी पथदर्शी ठरेल. विद्यार्थ्यांना भूमितीसारखा अवघड व बोजड विषय अध्ययन करताना आनंददायी व सुलभ होण्यास त्यामुळे मदतच होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.