Breaking News

स्नेहालय, हुनरशाळा ,मनपा यांच्यासह हक्काच्या घरासाठी संजयनगर एकवटले


१९७० पासून कच्च्या घरात राहणारे आणि पाणी-रस्ते-स्वच्छतागृहे-आरोग्य-शिक्षण आदी मुलभूत नागरी सुविधा नसल्याने नरक अनुभवणाऱ्या संजयनगर झोपडपट्टीतील २९८ परिवार लवकरच हक्काच्या सर्व सुविधायुक्त घरात प्रवेशणार आहेत. गेली दोन दशके नगर मधील झोपडपट्यांमधील मुलांच्या शिक्षण-आरोग्य-सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या स्नेहालय संस्थेने या संदर्भात पुढाकार घेतला होता. आज या प्रकल्पासाठी तांत्रिक सहयोग आणि संपूर्ण मार्गदर्शन देणाऱ्या कच्छ(गुजरात) येथील हुनरशाळा फौंडेशन, स्नेहालय, अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या सोबत झालेल्या संवाद बैठकीत या प्रकल्पाचा सर्व आराखडा संजयनगर मधील रहिवाश्यांसोबत चर्चिला गेला. तीन तासांच्या प्रश्नोत्तर आणि चर्चेअंती नियोजित गृह प्रकल्पाच्या आराखड्याला सर्वसमंती मिळाली. अहमदनगर महापालिकेच्या क्षेत्रात एकूण १७ शासनघोषित झोपडपट्ट्या आहेत. संजयनगरचा पथदर्शी गृहप्रकल्प यशस्वी झाल्यावर नगरमधील इतर झोपडपट्ट्यांतून राहणाऱ्या सुमारे ६२ हजार रहिवाश्यांना हक्काची घरे पुरविण्याची चळवळ गतिमान होईल असा विश्वास या उपक्रमाचे संघटक हनीफ शेख, जयश्री शिंदे, शबाना शेख यांनी व्यक्त केला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपअभियंता(मनपा-प्रकल्प विभाग) सुनील मेहेत्रे, हुनरशाळा चे संस्थापक आर्च.संदीप वीरमणी , आर्च आदित्य सिंग , अमेरिकेतील करी स्टोन फौंडेशन च्या संध्या नैडू, नगर सेवक अनिल शिंदे, स्थायी समिती च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा आणि दत्ता जाधव, नगर रचनाकार (मनपा-प्रकल्प विभाग)आर्च. भूपेंद्र कोल्हे, स्नेहालयचे संजय गुगळे, राजीव गुजर, गिरीश कुलकर्णी, अनिल गावडे, आदींनी या चर्चेत सहभाग घेतला. या वेळी संजय नगर मधील नजमा पठाण, राजू भंडारे, रुक्मिणी कांबळे, आशा काळोखे, सुनिता नायडू, मिलनसिंग जुन्नी, नागेश अटक, अशोक पंडित, वासंती मिटापरा, मुमताज पठाण, सीता लोंढे,

संजयनगर मधील संवाद आणि सहमतीनंतर महापालिकेत महापौर सुरेखा कदम, आयुक्त घनश्याम मेंगळे , नगरसेवक मुदस्सर शेख, बाळासाहेब बोराटे, सुवर्णा जाधव, श्री. वालगुडे, श्री. मेहेत्रे, श्री. अनिल शिंदे आणि संजय नगरचे प्रतिनिधी यांची पुन्हा एक बैठक झाली. आगामी काळात विविध निवडणुकांच्या आचार संहिता लागण्यापूर्वीच पुढील तीन महिन्यात या गृह निर्माण प्रकल्पाच्या सर्व शासकीय औपचारिकता पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी संघटीतपणे व्यक्त केला.

पुनर्वसन प्रकल्पांना भेट-



मागील दोन वर्षांपासून संजयनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प बेघरांसाठी व्हावा म्हणून स्नेहालयचा बालभवन प्रकल्प सातत्यपूर्ण प्रयत्न करीत होता. येथे १२ विविध जातींचे आणि तीन धर्मांचे २९८ परिवार राहतात. त्यात पुनर्वसित कुष्ठरुग्णांचा समावेशही आहे. त्यांना हक्काची घरे कशी देता येतील याची पाहणी करण्यासाठी प्रथम स्नेहालयच्या कार्यकर्त्यांचे पथक भूज येथे गेले. हुनरशाळा फौंडेशनच्या पुढाकाराने तेथील सर्व बेघर नागरिक अत्यंत दर्जेदार हक्काच्या घरात रहात आहेत. या प्रकल्पाच्या पाहणीनंतर संजयनगर मधील नागरिक, महापालिकेचे प्रमुख अधिकारी यांना स्नेहालयने करी स्टोन फौंडेशन आणि हुनरशाळा यांच्या मदतीने भूज मध्ये नेऊन भूज मधील प्रकल्प दाखविले आणि तपशिलात समजून सांगितले. संजयनगर येथे मागील ४ महिन्यात प्रत्येकाशी संवाद करून व्यापक सहमती स्वयंसेवी संस्थांनी निर्माण केली होती.

भारतात कुठेही घर अथवा जागा नसलेल्या परीवारानाच या योजनेतून ३२५ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. संजयनगर येथे एकूण २.९ एकर (८४४६ चौरस मीटर) जागा उपलब्ध आहे. त्यामुळे येथे तळमजला आणि वर दोन मजले अश्या पद्धतीने मंजुरीनुसार बांधकाम केले तरीही सुमारे ५०० चौरस मीटर जागा अपुरी पडते आहे. प्रतिचौरस फूट ९५० रुपये बांधकाम खर्च अपेक्षित असून ४ लाख रुपयात प्रत्येकाचे घर बांधून पूर्ण होणार आहे. येथील गृह प्रकल्पासाठी प्रत्येकाला केंद्र व राज्य शासनातर्फे प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान मिळेल. उर्वरित प्रत्येकी दोन लाख रुपयांसाठी गृहकर्ज तसेच खाजगी कंपन्यांची मदत स्वयंसेवी संस्था मिळवून देतील. तथापि प्रत्येक परिवाराने पुढील काळात जाणीवपूर्वक कष्ट आणि बचत करून किमान १ लाख रुपये स्वतःच्या घरासाठी उभे करायला हवेत असे आवाहन संयोजक संस्थांनी आणि श्री. मेहेत्रे यांनी केले. सध्या येथील जागेचा उतारा सरकारच्या नावाने निघतो. परंतु हा गृह प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रत्येकाचे घर त्याच्या नावावर असेल असे संध्या नायडू यांनी सांगितल्यावर जन्मापासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उपस्थित महिलांचे डोळे पाणावले.