Breaking News

बलात्कारप्रकरणी आसाराम बापू दोषी


जोधपूर । वृत्तसंस्था - गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसाराम बापू अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर एससी आणि एसटी कोर्टाने निर्णय दिला. आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी धरण्यात आले, तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. एकूण पाच आरोपींबाबत कोर्टाने आज निर्णय दिला. दि. 6 नोव्हेंबर 2013 रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस्ट अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा निकाल येण्याआधीच दिल्लीपासून जोधपूरपर्यंत सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जोधपूरला तर छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. राम रहीमचा निकाल आल्यानंतर ज्याप्रकारे त्याच्या अनुयायांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी हैदोस घातला, तशीच परिस्थिती यावेळीही होण्याची शंका पोलिसांना आहे. आसाराम दोषी ठरल्यास त्याचे समर्थक गोंधळ घालू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.