Breaking News

भाजप देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष असल्याचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने मंगळवारी दिला आहे.भारतीय निवडणूक आयोगाकडे 2016-17 या आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्च भाजप आणि काँग्रेसने सादर केले होते. त्याआधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपाने 1,034.27 कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले आहे. मागील वर्षापेक्षा ही वाढ 463.41 कोटी रुपये इतकी आहे. 2016-17 या वर्षात भाजपने 710.057 कोटी रुपये खर्च केले तर काँग्रेसने 321.66 कोटी रुपये खर्च केले. भाजप आणि काँग्रेसची तुलना केल्यानंतर असे दिसून आले, की 2015-16 आणि 2016-17 दरम्यान भाजपच्या उत्पन्नामध्ये 81.18 टक्क्यांनी (463.41 कोटी रु.) वाढ झाली आहे. तर काँग्रेसचे उत्पन्न 14 टक्क्यांनी घटले आहे. भाजप आणि काँग्रेस सोडून बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनी पक्षाचे उत्पन्न आणि खर्च असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडे जमा केले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे मागील 5 वर्षांपासून सातत्याने पक्षाचे अहवाल संस्थेकडे जमा करण्यास दिरंगाई करत आहेत, असे संस्थेने म्हटले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ही एनजीओ देशातील राजकीय आणि निवडणूक सुधारणांसाठी काम करते.