Breaking News

दखल - भयमुक्त नगर कधी होणार?

गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगरची राजकीय गुन्हेगारी देशभर गाजत असली, तरी नगरकरांच्या दृष्टीनं त्यात नावीन्य काहीच नाही. नगर हा डाव्यांचा बालेकिल्ला होता. पुरोगामी विचारांचा वारसा असलेला हा जिल्हा होता; परंतु गेल्या तीन-साडेतीन दशकापासून नगरमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नेत्यांचा नगरपालिका तसंच विधानसभेच्या निवडणुकीत उदय झाला. गुन्हेगारीतून मिळविलेला पैसा वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवून त्याला पांढरा करण्याचं काम नगरमध्ये झालं. वेगवेगळ्या वैध, अवैध व्यवसायाचं संरक्षण क रण्यासाठी गुंडाच्या टोळ्या पोसण्याचं काम या राजकारण्यांनी केलं.

नगरमध्ये शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या हत्येनंतर उडू लागलेली राजकीय राळ पाहता, येत्या सात-आठ महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका व नंतर लगेचच तोंडावर येणार्‍या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये या हत्यांचं भांडवल करून त्यावर मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जाईल, हे नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट व्हायला लागलं आहे. मुळात जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या सर्व मोठ्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापलीकडं पाहिलं नाही. जिल्ह्याचं ठिकाण म्हणून नगरचा विकास करावा, असं त्यापैकी कुणालाही वाटलं नाही. टाडातील आरोपी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी कायम सत्तेत राहिले. त्यांना पाठबळ देण्याचं काम जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनीही केलं. आता ज्यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप आहेत आणि यापूर्वी ज्यांनी कायम गुन्हेगारी केली, त्यांनीही विकासाचं राजकारण कधीच केलं नाही. त्यामुळं आता खासदार दिलीप गांधी व माजी आमदार अ निल राठोड यांची परस्परांवरील चिखलफेक फारशी दखल घेण्याजोगी नाही. राठोड पाच वेळा आमदार, तर गांधी तीनदा खासदार, एकदा उपनगराध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी विक ासाचे काय दिवे लावले, याचं उत्तर त्यांनी एकमेकांकडं बोट दाखविण्याआधी स्वत:च द्यायला हवं. येत्या डिसेंबरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. बरोबर 15 वर्षांपूर्वी नगर महापालिकेच्या निवडणुकीचा झालेला प्रचार आठवा. त्या वेळी विकासाचा मुद्दा कुठंच नव्हता. त्या वेळीही भयमुक्त नगरवर प्रचाराचा भर होता. गेल्या 15 वर्षांत नगर खरंच भयमुक्त झालं का, या प्रश्‍नाचं उत्तर गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या घटनेतून मिळालं आहे. नगरजवळचं केडगाव अविकसीत राहण्यामागंही तेथील गुंडगिरी हेच कारण असल्याचं कायम लोक बोलत. अर्थात लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणं राजा मिळतो, अशी एक म्हण आहे. नगरकरांपुढं आतापर्यंतच्या विधानसभा, महानगरपालिका, लोकसभेच्या निवडणुकीत अनेक चांगले पर्याय होते; परंतु नगरकर कायम भावनेच्या लाटेवर वाहवत गेले. कधी मुस्लिमांची भीती, कधी स्थानिक गुंडगिरीचा मुद्दा पुढं झाला. भयमुक्त नगरच्या प्रचारात अरुण जगताप यांचा महापालिकेच्या निवडणुकीत नगरकरांनी पराभव केला होता; परंतु पुढं काय झालं, हे वेगळं सांगायला नको. आता नगरकर गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर यायला लागला आहे. मशाल मोर्चे काढायला लागला आहे. हे लक्षण चांगलं असलं, तरी केवळ तेवढ्यावर अवलंबून राहून चालणार नाही.


केडगावची सत्ता भानुदास कोतकर यांच्या कुटुंबीयांभोवती राहिली आहे. खुनाच्या आरोपातून भानुदास कोतकर व संदीप कोतकर खुनाच्या आरोपात तुरुंगात आहेत. नगरच्या राजकारणात सोयरेशाहीला महत्त्व आहे. त्यात प्रा. शशिकांत गाडे यांचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व नातेवाईक या ना त्या कारणानं गुन्हेगारीशी संबंधीत आहेत. नगरमध्ये दाटलेले भय आणि तणाव अजूनही ओसरलेला नाही. या हत्येनंतर कोतकर, जगताप, कर्डिले यांच्या पूर्वेतिहासाची घरोघरी उजळणी होऊ लागली असून, दहशत व गुंडगिरीच्या असंख्य कहाण्याही दबक्या सुरात सांगितल्या जात आहेत. नगरमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनलेली असताना पालकमंत्री प्रा. राम शिंदे मात्र शिर्डीमध्ये पंचतारांकित सोहळ्यात मग्न होते. गुंडगिरीच्या विरोधात आजवर अनेकदा आवाज उठविण्यात आला. सामान्य एका नगरकरामुळं कोतकर पिता-पुत्राला तुरुंगवास झाला. त्या वेळी स्वयंसेवी संस्था पुढं आल्या नाहीत. आता सर्वंच प्रमुख आरोपी तुरुंगात असल्यामुळं नगरमधील काही स्वयंसेवी संस्थांनी शहरातील ढासळती कायदा-सुव्यवस्था, गलिच्छ राजकारण आणि कोतकर-ठुबे हत्येच्या विरोधात काढलेल्या मूक मेणबत्ती मोर्चात शहरातील संवेदनशील नागरिक प्रथमच रस्त्यावर आले. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आणि दहशत, गुंडगिरीने सत्ता राबविणार्‍या लोकांना मतदान करू नका असा स्पष्ट संदेश या मूक मोर्चानं आता दिला आहे; परंतु जनतेची स्मरणशक्ती कमी काळ असते, असं म्हणतात. महापालिकेच्या निवडणुकीला अजून सात महिने राहिले असताना तोपर्यंत हा मुद्दा प्रभावी राहील का आणि गुन्हेगारीच्या विरोधात नगरकर खरंच मतदान करतील का, या प्रश्‍नांची उत्तरं मिळायला काही काळ जाऊ द्यावा लागेल. ज्या नगर जिल्ह्याला सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा आणि विकासाच्या राजकारणाचा वारसा लाभला आहे, त्याच जिल्ह्यात, राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झाल्यानं सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा जवळपास संपुष्टातच आल्या होत्या. नगरच्या सांस्कृतिक, सामाजिक वर्तुळात, ज्याच्या शब्दाला प्रतिष्ठा असेल असं एखादं नावदेखील आज कुणाला सांगता येत नाही. अशी एक सामाजिक पोकळी निर्माण झालेली असतानाच, राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत गेल्यानं नगरवासीयांच्या सांस्कृतिक मानसिकतेलाही जबर धक्का बसला आहे. राजकारणातील गुन्हेगारीमुळं राजकारणातही सामान्य नगरकरास फारसा रस उरलेला नाही. गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या राजकीय घराण्यांचे पक्ष वेगवेगळे असले, तरी सोयरीकीमुळे, राजकारणात एक प्रकारची संघटित गुन्हेगारीच सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी शहरात निघालेला मूक मोर्चा ही नागरिकांच्या जाणिवा जागृत झाल्याची खूण ठरणार आहे. दहशत, खंडणीखोरी, हत्या, गुन्हेगारीचा शिरकाव झालेलं राजकारण झिडकारण्याची शपथ या मोर्चात नागरिक ांनी घेतली असली, तरी ती जेव्हा प्रत्यक्षात येईल, तेव्हाच नगरकर गुन्हेगारीच्या विरोधात उभा राहिला, असं म्हणता येईल.