सफाई कर्मचार्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा - सुशीलकुमार शिंदे
सोलापूर, दि. 10 एप्रिल - महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेते व सदस्यांनी राजकारण न करता एकदिलाने काम केल्यामुळे सफाई कर्मचार्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली. विकासकामात अशीच एकदिली ठेवा. सफाई कर्मचार्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत 71 सफाई कामगारांना सदनिकांच्या चावीचे वाटप माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेस संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष बाली मंडेपू यांनी केले. महानगरपालिकेतील सर्व सफाई कामगार व त्यांचे कुटुंबीय कार्यक्रमास उपस्थित होते.