Breaking News

रत्नागिरीत 28 एप्रिलपासून दुसरा मांडवी पर्यटन महोत्सव

रत्नागिरी, दि. 10 एप्रिल -  येथील मांडवी समुद्रकिनारी 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत दुसरा मांडवी पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था आणि श्री देव भैरव देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री देव भैरव देवस्थानचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, नगरसेवक बंटी कीर, नगरसेविका दया चवंडे, रशीदा गोदड, नितीन तळेकर, राजन शेटे, बिपिन शिवलकर, संतोष शिवलकर, काका तोडणकर, प्रवीण रुमडे, मनीषा बेडगे, शंकर मिलके, आदित्य वारंग यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कीर म्हणाले, शहरातील पर्यटन व्यवसायाला चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवसायाकडे आकर्षित करणे या हेतूने हा महोत्सव गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे. येत्या 28 एप्रिलला सायंकाळी मांडवी भैरी मंदिर ते मांडवी समुद्रकिनारा या मार्गावर शोभायात्रा निघणार असून, सहा वाजता वाळूशिल्प, खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनाने महोत्सवाला सुरुवात होईल.
महोत्सवामध्ये स्थानिक मच्छीमार मुलांच्या मदतीने पर्यटकांना मासेमारीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. तसेच मासे पकडण्याचा ‘रापण’ हा प्रकार पर्यटकांना सहभागी होऊन अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी घोडागाडी रपेट, फनफेअर असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. व्यवसायांत आणि कलाविष्कारांमध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त वाव दिला जाणार आहे. पर्यटकांना कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद देण्यासाठी खेकडे, कोळंबी, कालवे, मटण-वडे, कोंबडी-वडे, भाकरी, बिर्याणी यांबरोबरच जांभूळ, करवंद, तोरणे, काजू आदी रानमेव्याची चव चाखायला मिळणार आहे, असे कीर यांनी सांगितले.
महोत्सवांतर्गत रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेतर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धाही घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ जलतरणपटू शंकर मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होईल. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रकाश नाडर उपस्थित राहणार आहेत. नाडर हे दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. 10 आंतरराष्ट्रीय पदके, 135 राष्ट्रीय पदके, दोन जागतिक साहसी स्पर्धा पदके, तीन राष्ट्रीय साहसी पदके पटकावली आहेत. ते मूळचे तमिळनाडू येथील असून, वेगवेगळ्या 15 राज्यांत त्यांनी आतापर्यंत 110 वेळा रक्तदान केले आहे, असेही कीर यांनी सांगितले.