Breaking News

साहीत्य वितरणातील पारदर्शकतेचे समाधान मोठे ---सौ. विखे पाटील

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण करतानाच, वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ऑनलाईन पध्दतीने सुरू असल्याने लाभार्थ्यांच्या साहित्य वितरणातील पारदर्शकतेचे मोठे समाधान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.

लोहगाव येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थीनीसाठी सायकल, ग्रामपंचायत अपंग सहाय्य निधीतून शालेय गणवेश, छत्रीचे वितरण अध्यक्षा ना.सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच सौ. सीमा चेचरे,उपसरपंच सुरेश चेचरे, संचालिका वैशाली गिरमे, दूध संघाच्या संचालिका निर्मला दरंदले, संचालक भाऊसाहेब चेचरे, माजी संचालक केरूनाथ चेचरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना ना.सौ.शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण विकासाचे मुख्य केंद्र आहे. सार्वजनिक विकासाच्या प्रक्रियेबरोबरच सामान्य माणसाला व्यकीगत विकासाकरिता होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. मला जिल्हा परिषदेत दोनदा काम करण्याची संधी मिळाली. या सर्व कार्यकाळात विकासाचे निर्णय करताना शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी समान पध्दतीने कशी होईल यासाठी माझा प्रयत्न असतो.

आज ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनीची शिक्षण घेण्याची धडपड खूप मोठी आहे. केवळ उणिवा दाखविण्यापेक्षा या मुलांसाठी काय करता येईल याचा विचार गावपातळीवर झाल्यास विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळेल. आशी अपेक्षा ना.सौ.विखे पाटील यांनी व्यक्त केली.