Breaking News

मंत्रालय पेव्हर ब्लॉकची चौकशी करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे


आमदार निवास, मंत्रालय काँक्रिटीकरण, डेब्रीजची विल्हेवाट, उंदीर संहाराच्या घोटाळ्यानंतर ध्वजारोहणाच्या सोहळ्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवून मंत्रालय परिसर सुशोभीत करण्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. विशेष म्हणजे उल्लेखीत प्रकरणापुर्वीचे हे प्रकरण शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्या कार्यकाळातील असून या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी फेब्रुवारी 18 मध्ये मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्याने पेव्हर ब्लॉकचा हा अपहार चर्चेत आला आहे. काम न करता देयके काढता येतात हा सिध्दांत या प्रकरणाने शहर इलाखा साबांत हांडे यांनी रूजविल्यानंतर त्यानंतर शहर इलाखा साबांच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी देखील तो आदर्श समोर ठेवून चर्चीत घोटाळे केले, या सिध्दांतामुळे वाळके यांना हांडे गुरू स्थानी आहेत असा उपहास साबां वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान पेव्हर ब्लॉक विषयी तक्रार दाखल केलेले आमदार मुख्यमंत्र्यांच्या गोटातील असल्याने या प्रकरणाची चौकशी होऊन बेपत्ता पेव्हर ब्लॉकचा शोध घेण्याचे कर्तव्य प्रशासनाला पार पाडावे लागेल, असा विश्‍वास साबांतील एक गट व्यक्त करीत आहे.
राज्याचे मुख्यालय असलेले मंत्रालयाची देखभाल, डागडूजी करताना शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दाखवलेली चलाखी एका मागोमाग एक उघड होऊ लागली आहे. गेल्या पाच वर्षात (31 जानेवारी 2012 ते 10 आक्टोबर 2017) शहर इलाखा साबां विभागामार्फत झालेल्या विविध प्रकारच्या कामांमध्ये कार्यकारी अभियंत्यांनी कुठल्या न कुठल्या पध्दतीने घोळ केल्याचे गंभीर आरोप होत आहेत.
या काळात किशोर पाटील, रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके या कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या चापलुसीची साबां वर्तुळात विशेष चर्चा झडत आहे. या पैकी प्रज्ञा वाळके यांच्या सन 2015 ते 10 आक्टोबर 2017 या कालावधीतील मंत्रालय परिसर आणि आमदार निवास इमारतीशी संबधित कामातील अपहाराची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. 
मनोरा आमदार निवासातील अपहाराच्या प्रदिर्घ चर्चेनंतर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्यांना निलंबीतही केले गेले. अन्य घोटाळ्यांमध्येही त्यांचा संबंध चौकशीच्या पातळीवर सिध्द झाला असल्याने त्यातही कारवाई अपेक्षित आहे. तथापी प्रज्ञा वाळके यांनी शहर इलाखा साबां विभागाचा प्रभार घेण्याआधी कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी सांभाळत असलेले रणजीत हांडे यांच्या काळात घडलेला मंत्रालय परिसरातील पेव्हर ब्लॉकचा अपहार जानेवारी 18 अखेर पर्यंत दुर्लक्षित होता. माञ सत्ताधारी पक्षाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या गोटात वावर असणार्‍या एका आमदारांनी 6 फेब्रुवारी 2018 रोजी तक्रार अर्ज थेट मुख्यमंत्र्यांनाच सादर केल्याने हे पेव्हर ब्लॉक प्रकरण चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त असल्याने रणजीत हांडे यांनी मंत्रालयात परिसरात लावलेले पण न दिसणारे पेव्हर ब्लॉक शोधण्यात साबां प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. रणजीत हांडे यांचा हा पेव्हर ब्लॉक घोटाळा रंजक असून मिस्टर इंडिया चित्रपटात वापरली गेलेली अदृश्य दृश्य मिश्रणाचे तंत्रज्ञान हांडे यांनी पेव्हर ब्लॉकच्या कामात वापरले असावे, अशी कुचेष्टा केली जात आहे.
वाळकेंना हांडेंची प्रेरणा?
मनोरा आमदार निवासातील कामे न करता देयके अदा केल्याचा ठपका ठेवुन निलंबीत केलेल्या प्रज्ञा वाळके यांनी पुर्वाश्रमीचे कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्याकडून प्रेरणा घेतल्याची चर्चा साबांत आहे. कामे न करताही देयके अदा केली तर हितसंबंध वापरून प्रकरण दडपता येते हा सिध्दांत रणजीत हांडे यांनी शहर इलाखा विभागात रूजविला. त्यानंतर कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करतांना तोच कित्ता गिरवला. मात्र प्रज्ञा वाळके यांच्या कामांची चौकशी होऊन दोष सिद्ध झाल्यानंतर आता हांडे यांचीही चौकशी प्रस्तावित झाल्याने भ्रष्टाचाराचे गळू ठसठस करू लागले आहे.