Breaking News

पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनाने कौडाणेच्या माजी सरपंचांचे उपोषण मागे

कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे विविध प्रश्‍नांसाठी कौडाणे गावचे मा. सरपंच अनिल गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आले. पालकमंत्री ना. राम शिंदे यांचे हस्ते लिंबूपाणी देवून उपोषण सोडण्यात आले. 

या वेळी ना. राम शिंदे यांनी उपोषण कर्ते अनिल गंगावणे, गौतम सुद्रीक, महादेव पाटील, नवनाथ शिंदे, नितीन गंगावणे यांची कौडाणे गावातील उपोषणस्थळी भेट देवून चर्चा करून उपोषण कर्त्यांना आश्‍वासन दिले की, कोंभळी-कौडाणे-बिटकेवाडी हा रस्ता आणि कौडाणे-चांदे बु. रस्त्याचे लवकरच डांबरीकरण करू. या रस्त्याच्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करून हे रस्ते डांबरीकरण करू, तसेच माळढोक अभयारण्य आरक्षण कमी करावे या मागणीवर सकारात्मक मार्ग काढू, तसेच एस.टीची फेरीही वाढवू असे अश्‍वासन ना. राम शिंदे यांनी दिले. हे उपोषण मानव अधिकार जनअंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी ना. राम शिंदे यांना मा. सरपंच व मानव अधिकार जनआंदोलन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गंगावणे यांनी ना. राम शिंदे यांना कौडाणे गावची परिस्थिती समजावून सांगितली. कोंभळी-कौडाणे-बिटकेवाडी, कौडाणे-चांदे बु. रस्ता डांबरीकरण करणे, गाव हे डोंगराळ भागात असल्याने जवळपास सर्व रस्त्यांची अवस्था वाईट आहे. दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांचे हाल होत आहेत. कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा नसल्याने या गावातील मुलामुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. रस्त्याअभावी सर्वांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कौडाणे येथील वनविभागाचे माळढोक अभयारण्यासाठीचे आरक्षण हटविन्यात येऊन जाचक अटी शिथिल कराव्यात, एस.टी. बससेवा सुरु करण्यात यावी या सर्व मागण्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उपसभापती प्रशांत बुध्दिवंत, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, सा.बां. विभागाचे उपअभियंता अशोक भोसले, जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप कानगुडे, पं.स. सदस्य बाबासाहेब गांगर्डे, सरपंच वैशाली जगधने, उपसरपंच गौतम सुद्रीक, धनराज सुद्रीक, सुभाष सुद्रीक, शरद सुद्रीक, बापू सुर्यवंशी यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.