Breaking News

नीरव मोदी हाँगकाँगमध्ये ? अटकेसाठी सरकारची विनंती

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी हाँगकाँगमध्ये दडला असण्याची शक्यता आहे. त्याच्या अस्थायी अटकेसाठी (प्रोव्हिजनल अरेस्ट) परराष्ट्र मंत्रालयाने हाँगकाँग सरकारला विनंती केली आहे. यासंदर्भातील माहिती परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के.सिंह यांनी राज्यसभेत दिली.

राज्यसभेत चर्चेदरम्यान नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या ठावठिकाण्याविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना मंत्री सिंह यांनी माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या ’पीएनबी’त 11 हजार 421 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी, गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चोक्सी यांसह पीएनबीच्या अन्य अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नीरव मोदी, मेहुल चोक्सी फरार असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट बजावण्यात आले आहे.