Breaking News

सांप्रदायिक सौहार्दासाठी काँग्रेस देशभरात उपोषण

नवी दिल्ली: देशातील सांप्रदायिक सौहार्द वाचवण्यासाठी व त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस 9 एप्रिलला देशस्तरावर उपोषण करणार आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा सौम्य करण्याच्या निर्णयाविरोधातील भारत बंददरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला. देशभरात 2 एप्रिलला झालेले आंदोलन काही कालावधीनंतर लगेचच हिंसात्मक झाले. यावेळी दगडफेक, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि रेल्वे रोको झाला. उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार, गुजरात आणि पंजाब अशा अनेक राज्यांमध्ये आंदोलन हिंसक झाले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 20 मार्चच्या निर्णयात या कायद्याअंतर्गत तत्काळ अटकेचे प्रावधान शिथिल करत अटकपूर्व जामिनाची तरतूद केली आहे. सोबतच या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याअगोदर पोलीस उपअधीक्षकांनी प्राथमिक चौकशी करण्यास व सरकारी अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याअगोदर त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याची परवानगी घेण्यास सांगितले आहे.