Breaking News

डॉ. विखेंविरोधात व्यक्त होताना, ढाकणेंनी नेमके काय साध्य केले ?


राजेंद्र देवढे/ पाथर्डी विशेष प्रतिनिधी - ’जिल्हा विभाजनाऐवजी विकासाची गरज आहे’! जामखेडला डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या या विधानाचा प्रतिवाद करताना, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून जे मुद्दे उपस्थित केले, ते ’गृहपाठ’ करून मांडले असते तर त्यात अजुनही प्रगल्भता वाटली असती. कारण अ‍ॅड. ढाकणे यांनी ज्या पद्धधतीने सदर पत्रकार परिषद हाताळली, ती त्यांच्या बुद्धीलौकिकास छेद देणारी ठरली. घाई केल्यामुळे ढाकणेंनी हकनाक स्वतःचे हसे करून घेतले. एवढाच काय तो एकमेव निष्कर्ष, त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या मोघम चिंतनातून निघतो. डॉ. विखेंच्या विधानाचा परामर्श घेताना, अ‍ॅड ढाकणेंच्या बुद्धीमत्तेचे प्रतिबिंब सदर पत्रकार परिषदेत उमटण्याऐवजी त्याला विखेंविषयीच्या आकसाचा दर्पच जास्त प्रमाणात जाणवतो. उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेचा भौगोलिक विकास झाला नाही. याचे कारण फक्त विभाजनच आहे, हा युक्तीवाद करताना ढाकणेंनी दक्षिणेतल्या पुढार्‍यांच्या नाकर्तेपणावरही बोट ठेवले असते तर तो मुद्दा अजुनही संयुक्तिक वाटला असता. कारण उत्तरेतले धनदांडगे दक्षिणेचा निधी पळवत असताना, दक्षिणेतले आक्रमक नेते नेमके त्यावेळी काय करत होते? त्यांचे हात बांधले होते की, दक्षिणेच्या विकासाशी त्यांना काही एक देणेघेणे नव्हते? हे प्रश्‍न त्या अनुषंगाने आपोआप निर्माण होतात. याशिवाय दक्षिणेचा विकास खुंटत असताना दक्षिणेतले नेते मात्र धनदांडगे झाले, या वस्तुस्थितीचे आत्मपरिक्षण करणे अ‍ॅड. ढाकणेंनाच सर्वाधिक गरजेचे असताना त्यांनी हा स्वतःवरच बुमरँग होऊ शकणारा प्रश्‍नच उपस्थित करायला नको होता.

विद्वत्ता ही वयावर अवलंबून नसते, हे चौदा वर्षे वयाच्या मुक्ताईला गुरू मानून चौदाशे वर्षे वयाच्या चांगदेवांनीच सिद्ध केले आहे. हे विविध साहित्य कोळून प्याल्याचा दावा करणार्‍या उच्च विद्याविभूषित अ‍ॅड. ढाकणेंना माहिती असूनही, त्यांनी डॉ. विखेंच्या ओठावरचे दूध सुकले नसल्याची चिंता हकनाकच व्यक्त केली. डॉ.विखे सातत्याने जिंकत असताना ते भरकटले आहेत हा, अ‍ॅड. ढाकणेंचा दावाही त्यांच्या लौकिकास साजेसा नाही. याऊलट डॉ.विखेंसमोर त्यांचे ध्येय स्पष्ट असून, ते दक्षिण पिंजून काढत असताना, नुसत्या पत्रकार परिषदा आयोजित करुन चालणार नाही. हे लक्षात घेऊंन त्यांनी रणांगणात उतरणे गरजेचे आहे. हे संघर्षाचा वारसा लाभलेल्या अ‍ॅड. ढाकणेंनी वेळीच ओळखायला हवे!’तुम्ही मोठे होत असताना, आम्हाला लहान करू नका’ हे ढाकणेंचे विधान त्यांच्या अगतिकतेतून आले असले तरी, राजकीयदृष्ट्या ते प्रगल्भ वाटत नाही. कारण यातून स्वतःच आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचे मोठेपण अधोरेखीत करुन आपल्याला लहान ठेवायचा निर्णयही त्याच्याच हाती असल्याचा संदेश लोकांत जातो. यासाठी संपूर्ण दक्षिणेतल्या नेत्यांना संघटीत व्हायचे आवाहन करताना अजून एक चूक अशी होते की, एका ओठावरचे दूध सुकले नसलेल्या पोराला आवरणे हे एकट्याला शक्य नाही. तर त्यासाठी कळपाची गरज आहे. अजून एक बाब म्हणजे दक्षिणेत भांडणे लावण्याची. त्यासाठी एकमेव पाथर्डी नगरपरिषदेच्या निवडणूकीतला विखेंचा सहभाग एवढेच कारण पुरेसे नाही. कारण फक्त पाथर्डी म्हणजे दक्षिण नाही. या विधानाने फार तर नगरपरिषदेत पराभूत झालेल्या ढाकणेंच्या सहकार्‍यांचा विखेविरोध प्रज्वलित होऊ शकतो. दिलदार स्वभावाचे राजकारणी म्हणून अ‍ॅड. ढाकणेंची ओळख आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांचा जिल्हाभर संपर्क प्रस्थापित झाला होता. 

डॉ. विखेंवर टीका करण्याऐवजी त्यांनी दक्षिणेसाठी त्यांचे काय व्हिजन आहे, याचा उहापोह पत्रकार परिषदेत केला असता तर ते अजूनही योग्य ठरले असते. याऊलट अगोदरच चर्चेत असलेल्या डॉ.विखेंवर टीका करुन त्यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांना अजूनच चर्चेत आणले. अ‍ॅड. ढाकणेंकडे मोठा राजकीय वारसा आहे. गल्ली ते दिल्ली हादरवून टाकणारे त्यांचे पिताजी जेष्ठ नेते बबनराव ढाकणे यांची वादळी व देदीप्यमान राजकीय कारकीर्द अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. दक्षिणेचा विकास झालाच असता तर तो त्यांच्याच काळात होणे शक्य होते. कारण त्यांच्या उंचीचा एकही नेता त्या काळी दक्षिणेत नव्हता. अशी दीर्घकाळ सत्तेत राहण्याची मॅरेथॉन कारकीर्द अन्य कुणाच्याही नशिबी आजवर आली नाही.डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिणेतल्या, सरकार दरबारी अनुदानास पात्र ठरलेल्या 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन लोकसभेचा श्रीगणेशा केला आहे. जनसेवा फाऊन्डेशनच्या माध्यमातून सर्वरोगनिदान शिबीरांचे आयोजन करून या शिबीरात दाखल झालेल्या रुग्णांवर उपचारांचीही व्यवस्था केली आहे. हे सारे करत असताना अतिशय शिस्तबद्ध रितीने त्यांचा जनसंपर्क प्रस्थापित होत आहे. आजवर झालेल्या एकाही सभेत त्यांनी वैयक्तिक पातळीवर कुणावरही टीका केलेली नाही. अतिशय गुणवत्तेच्या राजकारणाची प्रचिती ते लोकांना देत आहेत. असे असताना त्यांच्यावर केवळ टीका करुन अ‍ॅड. ढाकणे चर्चेत येऊ पाहात असतील तर त्यामुळे डॉ.विखेच अधिकाधिक चर्चेत येतील.


कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळो वा ना मिळो, लोकसभेची निवडणूक लढवायचीच! या इराद्याने डॉ.विखेंनी त्यांची तयारी सुरु केली आहे. याऊलट कोणत्यातरी पक्षाची उमेद्वारी मिळाली तरच अ‍ॅड.ढाकणे लोकसभेची निवडणूक लढवतील. अ‍ॅड. ढाकणेंना, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी लढणे गरजेचे आहे. त्यामुळे तिकीटाची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी आता बाहेर पडायला हवे. प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्याऐवजी दक्षिणेच्या विकासाचे प्रारूप लोकांसमोर मांडायला हवे. पत्रकार परिषदेत फक्त पत्रकारांनाच नेता दिसतो. तो मतदारांना दिसायला हवा. हे जितके लवकर अ‍ॅड. ढाकणेंच्या लक्षात येईल तितके ते त्यांच्यासाठी श्रेयस्कर ठरेल.