Breaking News

५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव-२०१८: प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कारांची घोषणा


पंचावन्नाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी इडक, रेडू, झिपऱ्या, नशीबवान, मंत्र, मला काहीच प्रॉब्लेम नाही, असेही एकदा व्हावे, भेटली तू पुन्हा, क्षितिज-एक होरायझन, मुरांबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता प्रभो शिवाजी राजा, कॉपी, अ ब क या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी पिप्सी, हृदयांतर,पळशीची पी.टी यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६१ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून सुरेश खरे, अरुण म्हात्रे, नरेंद्र पंडीत, अनंत अमेम्बल, केशव पंधारे, विजय कदम,शरद पोळ, नरेंद्र कोंद्रा, अंजली खोबरेकर, शरद सावंत, जाफर सुलतान, अशोक राणे, सतीश रणदिवे आणि कांचन अधिकारी यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार ३० एप्रिल २०१८ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.