Breaking News

नव्हे हा आभास, असे सायास, घेतला ध्यास ...विकासाचा!

राजेंद्र देवढे/विशेष प्रतिनिधी- पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पाथर्डी तालुक्यातील 42 गावांची निवड झाली. आणि तेव्हापासून या गावांत श्रमदानाची चुरस निर्माण झाली आहे. एकप्रकारे हे जलसाक्षरता रुजू लागल्याचे सुलक्षण आहे. याला जोड मिळाली आहे ती, या तालुक्याच्या आमदार मोनिका राजळे यांच्या प्रबळ इच्छाशक्तीची! त्यांनी या कामांत स्वतःला झोकून देऊन श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे स्थानिक श्रमदात्यांचा उत्साह द्विगुणीत होताना दिसून येत आहे. ज्यायोगे हा नुसता आभास नसून यातूनच विकासाच्या ध्यासाचा संदेश मतदारसंघात जाताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे जेथे जेथे श्रमदानाविषयी मरगळ आहे तेथे तेथे ती झटकली जाऊन स्फुर्ती निर्माण होऊ लागली आहे.

पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेस अभिनेते अमिर खान यांनी भेट देऊन या कामाची पाहणी केल्यानंतर खासकरुन ज्या 42 गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला, त्यातील 10 गावांनी या स्पर्धेत विशेष प्रगती दर्शविली आहे. नेमकी हीच बाब हेरुन आमदार राजळेंनी सदर गावांना भेटी देत स्वतः श्रमदानात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीमुळे या गावांतील श्रमदात्यांत उत्साह तर संचारलाच, याशिवाय उर्वरित गावांतही श्रमदानाप्रती सकारात्मक वातावरण निर्माण झाले. विजीगिषू नेत्याचे हेच लक्षण समाजाला विकासाभिमुख करण्यास कारणीभूत ठरत असते. कधीही उन्हातान्हाची सवय नसलेल्या आपल्या नेत्रीला घामाघूम होईपर्यंत श्रमदान करताना पाहून सर्वसामान्यांना त्याचे अप्रूप तर वाटतेच, शिवाय सदर कामात श्रमदान करण्यासाठी 
एकप्रकारची स्फुर्तीही निर्माण होत असते. सर्वसामान्यांचे हेच मानसशास्त्र अचूक हेरण्याची क्षमता असलेले नेते विरळच असतात. आमदार राजळेंनी नेमके हीच मानसिकता ओळखून श्रमदात्यांत चैतन्य व स्फुर्ती निर्माण करण्यासाठी स्वतः कंबर कसली. आणि नुसता दिखाऊपणा न दाखवता प्रत्यक्षात श्रमदानही केले. सदर श्रमदात्यांच्या पंक्तीत बसून सहभोजनही केले. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होणे क्रमप्राप्त असल्याने जलसंधारणाच्या बाबतीत क्रांतीकारी वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या कृतीचा बोलबाला होणेही स्वाभाविकच असल्याने तोही यथायोग्य झाला. छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट या सेनानिंचा सैन्यात असलेला प्रत्यक्ष सहभागच त्यांना यशस्वितेच्या एका विशिष्ट उंचीवर घेऊन गेला. अगदी तशीच कृती आमदारांनी केल्यामुळे त्यांनाही जनतेचे प्रेम मिळणे स्वाभाविकच आहे.आमदार मोनिका राजळेंना त्यामुळे मिळालेली लोकप्रियतेची रसद आगामी निवडणूकीत कामी येईलच. याशिवाय त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळं मोल प्राप्त झालं आहे. सर्वसामान्य 
जनतेचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अमुलाग्र बदलला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना असोत वा सार्वजनिक, पतीनिधनाच्या धक्क्यातून सावरल्यानंतर ज्या तडफेने आमदार राजळेंनी कामांचा अनुशेष भरुन काढण्याचा धडाका लावला आहे, त्याला तोड नाही. त्यांची हीच तडफ 
सर्वसामान्यांना दिलासादायक ठरताना आढळून येत आहे. इतर लोकप्रतिनिधींना अनुकरणीय ठरावे अशा पद्धतीने त्यांचे काम चालू आहे. स्व. राजीव राजळेंची उणीव त्यामुळे भरुन निघत आहे. आणि विकासाच्या प्रत्येक कामाची परिपूर्ती ही त्यांना अप्रत्यक्षरित्या श्रद्धांजली ठरत आहे.