Breaking News

सातबाराबरोबरच आता आठ अ वरही होणार पोटखराबाची नोंद

नव्याने आलेल्या शासन आदेशानुसार सातबारा उतार्‍याप्रमाणेच आठ अ उतार्‍यावरही जमिनीच्या पोटखराबा क्षेत्राची नोंद करता येणार आहे. महसूल विभागाने नुकतेच याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आठ अ उतार्‍यात सुधारणा करून त्यात पोटखराबा क्षेत्राचा समावेश करण्याचे सूचित केलेले आहे.


सातबारा उतार्‍यावर लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब्याचे क्षेत्र आणि एकूण क्षेत्र यांचा समावेश असतो. तर आठ अ उतार्‍यात केवळ लागवडीयोग्य क्षेत्राचा समावेश असायचा. आठ अ उतार्‍यावरील जमिनीचे क्षेत्र आणि सातबारा उतार्‍यावरील क्षेत्र यात तफावत दिसायची. अनेकांचे लागवडीयोग्य क्षेत्रापेक्षा पोटखराब्याचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे जमिनीवर कर्ज घेताना किंवा इतर प्रकरणे करताना त्या पोटखराबा क्षेत्राचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नसे. सातबारा आणि आठ अ या दोन्ही उतार्‍यांवरील क्षेत्रांची आकडेवारी जुळविण्याची आवश्यकता असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
प्रत्येक तलाठी सजामध्ये गाव नमुना आठ अ उतारे सुधारित नमुन्यात ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी, तसेच सातबारा संगणक प्रक्रियेमध्ये नमुन्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, अशा सूचनाही महसूल विभागास परिपत्रकामार्फत देण्यात आल्या आहेत.