Breaking News

पाथर्डीत जुन्या अभिलेख कक्षाला आग


पाथर्डी -(प्रतिनिधी) - पाथर्डी तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालणार्‍या तहसील कार्यालयाच्या जुन्या अभिलेख कक्षाला आग लागून जुने अभिलेखासह पोलिसांनी विविध गुन्ह्यातील जप्त केलेली दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत .याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटे पाच ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली जुनी अभिलेख कक्षाची खोलीतील अभिलेखाला आग लागली. नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या आग लागल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी तात्काळ ही बाब पाथर्डी नगरपालिका अग्निशामक कक्षकाला कळवली परंतु अग्निशामक गाडी घटना ठिकाणी नेहमीप्रमाणे उशिराने पोहचली .तोपर्यंत आगीच्या वनव्याने अभिलेख कक्षातील जुनी शिधापत्रिकेचे फॉर्म तसेच शासकीय कागदपत्रे तसेच शेजारी पोलिसांनी गुन्ह्यातील जप्त केलेल्या मुद्देमालातील काही दुचाकी गाड्यांना आग लागून जळून गेल्या. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर नायब तहसीलदार पंकज नेवसे आदींनी घटना ठिकाणी धाव घेवून आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला योग्य त्या सूचना दिल्या.आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यासह पोलीस कर्मचार्यांनी तहसिल कर्मचार्‍यांनी मदत केली. पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये सदरील घटने बाबत पोलिसांनी अकस्मात आगीच्या घटनेची नोंद केली आहे.तर ही आग लावली गेली की लागली हा प्रश्‍न मात्र गुलदस्त्यात आहे.