Breaking News

सत्तेसाठी लांडगे एकत्र आले.मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात.

मुंबई - पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपला जोरदार यश मिळत आहे, त्यामुळे केवळ सत्ता संपादन करण्यासाठी राज्यातही लांडगे एकत्र आल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वांद्रे इथल्या संकुलात आयोजित भाजपच्या 38 व्या स्थापना दिनाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.
विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा नाही तर डल्लामार मोर्चा आहे. राज्याला लुटून झाल्यावर सत्ता गेली, ती सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र होत असून लांडगे सत्तेसाठी एक त्र आल्याचे त्यांनी म्हटले. 


राज्यात कोणताही घोटाळा ते बाहेर काढू शकले नाही, कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नसल्याने केवळ सत्ता मिळवण्यासाठी हे लांडगे समाजात द्वेष पसरवून तेढ निर्माण करतील. दंगलीही घडवतील. पण, आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. त्यांचा निःपत करूनच आम्ही पुढे जाऊ असेही ते म्हणाले. उंदरांच्या गोळ्यांवर बोलणार्‍यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी नालायक असा केला. त्यावेळी भाजप नेते एकनाथ खडसे त्यांच्या मागेच बसले होते. मुख्यमंत्री म्हणाले, की काही लोक उंदरांच्या गोळ्या घेऊन बसले आहेत, पण त्याच नालायकांनी तीन वर्षांपूर्वी हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. विरोधकांकडून मागास घटकांना नेहमी आरक्षण काढून घेणार असल्याची भीती दाखवली जाते. पण, भाजप कधीही संविधानात दिलेले आरक्षण हिरावून घेऊ शकत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांनाही लक्ष केले. राज ठाकरे यांनी अनेक सभांमध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मॉनिटर असा केला आहे. यालाही त्यांनी आज मेळाव्यात उत्तर दिले. मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे, तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही, या शब्दात त्यांनी राज ठाकरेंना सुनावले.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. पवार साहेब तुम्ही माझ्या चहाच्या खर्चाविषयी बोलता. ’आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणार्‍या लोकांनाही आम्ही चहाच देतो,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच, त्यांनी पवारांना थेट इशाराही दिला, पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 मध्ये झालेली दाणादाण लक्षात असुद्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.