Breaking News

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण; चौकशीसाठी न्यायाधीश शाम दर्णे यांची नियुक्ती.

मुंबई : धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी माजी प्रधान व जिल्हा न्यायाधीश शाम दादाजी दर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज मिनीचा योग्य मोबदला दिला गेला नसल्याच्या कारणावरून धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केली होती.

या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. या विषयावर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मा पाटील प्रकरणाची माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आश्‍वासन सरकारने सभागृहात दिले होते. त्यानंतर आज माजी न्यायाधीश शाम दादाजी दर्णे यांची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. 

धुळे जिल्ह्यातील विखरण येथील ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला नसल्यामुळे धर्मा मंगा पाटील या वयोवृद्ध शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. बाजूच्या शेतकर्‍याला 1 कोटी 80 लाख आणि आम्हाला फक्त 4 लाख रुपये दिले जात असल्यामुळे धर्मा पाटील यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.


धर्मा पाटील यांच्या जमिनीला योग्य मोबदला का मिळाला नाही, त्यांच्या शेतात आंब्याच्या रोपांसाठी नुकसानभरपाईची जी मागणी केली आहे, ती योग्य आहे का, हे तपासून पाहण्यासाठी, तसेच बाजूच्या शेतकर्‍याला जास्तीचा मोबदला कसा दिला गेला, याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधिशांनी तीन महिन्याच्या आत चौकशी करून त्यांच्या शिफारशी या शासनाला द्यायच्या आहेत. चौकशीसाठी मुख्यालय हे धुळे ठेवण्यात आले आहे.