Breaking News

कल्याण विशाखापटणम या राष्ट्रीय महामार्ग रखडला!

पाथर्डी प्रतिनिधी - कल्याण विशाखापटणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हालअपेष्टांना पारावार राहिला तर नाहीच. याशिवाय पाथर्डी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर बांधण्यात आलेल्या साईड गटारांचा स्लॅब, नगण्य लोड असलेल्या वाहनांच्या भारामुळे ठिकठिकाणी खचू लागला आहे. कामाच्या निकृष्टतेचा दर्जा सिद्ध झाला आहे. असे प्रकार निदर्शनास येऊनही या महामार्गाचे प्रशासन झोपले आहे काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. 

नगरपासून चाँदबिबीच्या महालाच्या पश्चिमेच्या पायथ्यापर्यंत झालेले रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी उखडत आहे. त्यावर शेवटचा डांबरीकरणाचा थर देण्यापूर्वीच महामार्गाचा मध्यभाग तसेच बाजूच्या पट्ट्या मारुन, या कामाचे देयक उपटण्यासाठी घाई करण्यात येत आहे. तेथून पुढे मेहेकरीपर्यंत डांबरीकरणाचा एक थर मारुन त्यावरही पट्ट्या मारुन त्याचेही देयक उपटले असल्याचा दाट संशय आहे. मेहेकरीपासून साधारणतः एक किलोमीटर रस्त्याचे काम उरकले आहे. तेथेही दोनशे फूट रस्ता तसाच सोडून कौडगावच्या जवळपासपर्यंत अर्धवट काम झाले आहे. करंजी घाटाचा पायथा ते करंजीदरम्यान असाच प्रकार घडला आहे. 

करंजी ते देवराईच्या पुलापर्यंत काम पुर्णत्वास गेले असून देवराई गावठाणातून जाणारा रस्ता तसाच सोडला आहे. त्यावर इतके खड्डे पडले आहेत की, ते चुकविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तीच परिस्थिती निंबोडी व तिसगावच्या शिवाच्या मध्यावर असलेल्या पुलाच्या दरम्यान आढळून येते. तिसगांव ते निवडुंगे दरम्यान रस्ता पूर्ण झाला असला तरी पुलांवर डांबरीकरण न झाल्यामुळे उडणाऱ्या धुळीने प्रवासी त्रस्त होत आहेत. या पुलांलगत असलेल्या फळबागांचे धुळीमुळे अपरिमीत नुकसान झाले आहे. निवडुंग्यातील खड्ड्यांतून सुटका होत नाही तोच रस्त्याच्या एका बाजूला टाकलेल्या खडीमुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते. 

या महामार्गाचे काम सुरु झाले आणि त्यातील निकृष्टपणामुळे अनेक आंदोलनेही झाली. परंतु त्यावर काही एक उपाययोजना न होता ती गप्पगार झाली. रास्तारोको होणार, तो मागे घ्यावा म्हणून आश्वासन देण्यासाठी जबाबदार अधिकारी येईपर्यंत आंदोलक तावातावाने भाषणे ठोकणार आणि त्यांनी तोंडी अथवा लेखी आश्वासन दिले की, आंदोलक आणि प्रसार माध्यमे शांत होणार, अशी वेताळाच्या कथांसारखी हीच परिस्थिती वारंवार पाहण्याचे दुर्देव लाभलेले प्रवासी मात्र सातत्याने धूळच खात आहेत.