Breaking News

सप्तशृंग गडावर एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा...

कळवण प्रतिनिधी-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपिठ असलेल्या सप्तशृंग गडावरील भवानी पाझर तलाव पुर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणी टंचाईचा सामना गडावरील नागरीकांना करावा लागत असुन टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थासंह भाविकांना अवलंबुन रहावे लागत असल्याने दरवर्षी प्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा गडवासियांना सोसाव्या लागत आहेत.

सप्तशृंग गडावर भवानी पाझर तलावातुन पाणीपुरवठा केला जातो.मात्र उन्हाळ्याची चाहुल लागताच गडावर पाणीटंचाईची समस्या दरवर्षी नित्याचिच झाली आहे.भवानी पाझर तलावाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच गडावरील नागरीकांना उपलब्ध नाही.ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळी पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागतो.भवानी पाझर तलावात होणारा मर्यादीत पाणीसाठा आणि लिकेज मुळे उन्हाळ्यात हा तलाव कोरडाठाक पडल्याचे चित्र दरवर्षी बघायला मिळते.यंदाही एप्रिलच्या मध्यातच तलाव कोरडाठाक झाल्याने गडावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.
पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम यंदा हाती घेण्यात आले असुन लिकेज काढण्यासोबतच तलावातील गाळ ही काढला जात असल्याने पुढच्या वर्षीपासुन गडावर पाणी टंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत अशी आशा गडावरील नागरीक व्यक्त करत आहेत.मात्र सध्याची भयाण परिस्थिती बघता पुढील दोन महिने पाण्याची स्थिती गंभीर होणार असुन गडावरील पाणीटंचाईच्या दृष्टीने शासनाने तत्काळ दखल घेवुन उपाययोजना करणे गरजेचे आहे.सध्या मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागत आहे.