Breaking News

प्रज्ञा वाळकेंच्या निलंबनाने शहर इलाखातील अन्य घोटाळ्यांचीही चौकशी


मुंबई/विशेष प्रतिनिधी: शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभातील मनोरा आमदार निवास घोटाळ्याला जबाबदार ठरवून तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने निलंबीत झाल्यानंतर या विभागातील अन्य घोटाळ्यात अडकलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. आमदार निवास घोटाळ्याप्रमाणेच सन 2014-15 मधील मंत्रालय पेव्हर ब्लॉक प्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांचीही चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. पेव्हर ब्लॉक प्रकरणात प्रज्ञा वाळके आणि रणजीत हांडे या दोन्ही तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांचे संगनमत असल्याची चर्चा या घोटाळ्याला पुष्टी देत असल्याने चौकशी अपरिहार्य मानली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदीला जबाबदार असलेल्या बेमुवर्तखोर अभियंत्यांच्या मुसक्या आवळण्याची इच्छा शक्ती दाखवल्यास दोषींना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळू शकते याचा प्रत्यय शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या निलंबनातून आला आहे. गेल्या पाच-सहा वर्षात शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या काही भ्रष्ट अभियंत्यांच्या खाबुगीरीने शासकीय निधीची परस्पर विल्हेवाट लावली गेल्या विकास कामांचा बट्याबोळ तर झालाच शिवाय जनतेच्या निधीचाही अपव्यय झाला.कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्या कार्यकाळात भ्रष्ट कारभाराला सुरूवात झाली. रणजीत हांडे, प्रज्ञा वाळके या कार्यकारी अभियंत्यांनीही ती परंपरा कायम ठेवली. किशोर पाटील यांच्या काळातील 98 कोटींच्या निविदा रद्द करण्याच्या प्रस्तावाची भानगड, रणजीत हांडे यांच्या काळातील मंत्रालयातील एस आकाराच्या पेव्हर ब्लॉकचा अपहार, प्रज्ञा वाळके यांच्या काळातील मंत्रालयाचे काँक्रीटीकरण, डेब्रीजची विल्हेवाट, आकाशवाणी, मनोरा आमदार निवास इमारतीतील कक्ष देखभाल दुरूस्तीचा सावळा गोंधळ आणि काल परवा चव्हाट्यावर आलेले मंत्रालयातील उंदीर प्रकरण ही शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या भ्रष्ट मानसिकतेचे ठळक नमुने आहेत.

यापैकी मनोरा इमारतीतील आमदारांच्या कक्ष दुरूस्तीच्या कामात प्रज्ञा वाळके यांनी दाखवलेली हातसफाई चव्हाट्यावर येऊन कोट्यावधीचा अपहार वाळके आणि कंपनीने केल्याचे सिध्द झाले. गेले सहा महीने या प्रकरणाचे कवित्व गायीले जाऊन प्रशासन पातळीवर कारवाईचा शिमगा सुरू होता. दैनिक लोकमंथन, आ. चरणभाऊ वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते राजु खरे यांच्या संयुक्त पाठपुराव्यामुळे प्रशासनाला शरणागती पत्करून प्रज्ञा वाळके यांना निलंबीत करण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रशासनाने प्रज्ञा वाळके यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबीत करण्याचा पवित्रा घेतला असला तरी प्रशासनाने निलंबन आदेश काढतांना चलाखी केल्याचा आरोप होत आहे. प्रज्ञा वाळके यांच्या कृष्ण कृत्याचा ताळेबंध मांडल्यानंतर निलंबन नैसर्गीक न्याय ठरू शकत नाही. कामे न करता कोट्यावधी रूपयांची देयके अदा करून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत सिध्द झाले आहे.हे कृत्य फौजदारी स्वरूपाचे आहे. कोट्यावधी रूपयांच्या अपहाराविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे कोट्यावधीचे झालेले नुकसान वसुल करणे आणि जाणीवपुर्वक अपहार केलेल्या अभियंत्यांना बडतर्फ आवश्यक होते. मात्र साबां प्रशासनातील संगनमत केवळ निलंबन करून मोकळे झाले.
गेले अनेक दिवस प्रतिक्षेत असलेले निलंबन झाल्याने शहर इलाखा साबां विभागातील प्रज्ञा वाळके यांचा मंत्रालय काँक्रीटीकरण, डेब्रीज आणि उंदीर घोटाळा यांसह अन्य काही घोटाळे अद्याप कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत. या घोटाळ्यांना जबाबदार असलेल्या किंबहूना ज्यांनी हेतुपुरस्सर अपहार करण्याच्या उद्देशाने काम केले त्या कार्यकारी अभियंत्यांवरही गंभीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोटाळ्यांमध्ये कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्या कार्यकाळात झालेला सन 2014 चा पेव्हर ब्लॉक घोटाळा चौकशीच्या रडारवर आहे.

सन 2014 मध्ये रणजीत हांडे यांच्याकडे शहर इलाखा साबां विभाग कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार असतांना 15 ऑगस्ट 2015 या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी मंत्रालय परिसरात एस आकाराचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे टेंडर प्रस्तावित होते. रणजीत हांडे यांनी या कामांचे टेंडर विनायक मजूर सह. संस्था आणि पुर्णिमा मजूर सह. संस्था यांना मंजूर करून दि. 6 डिसेंबर 2014 रोजी अनुक्रमे रू 9,91,025 आणि रू. 14,78,993 सममुल्य कार्यादेश दिला. एस आकाराचे 203 एमएम बाय 101 एमएम डायमेंशनचे पेव्हर ब्लॉक बसविणे प्रस्तावित होते. या कामात जाणीवपुर्वक गैरव्यवहार झाल्याचे पुरावे उपलब्ध असून रणजीत हांडे यांनी कार्यादेश दिलेल्या या कामांचे देयके अनेक घोटाळ्यात अडकल्याचा संशय असलेल्या निलंबीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी अदा केल्याने या प्रक्रियेत घोळ असल्याचा संशय व्यक्त होत आहे. रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी संगनमताने हा घोळ केल्याची चर्चा आहे. प्रज्ञा वाळके यांची कार्यपध्दती लक्षात घेता रणजीत हांडे यांच्या कार्यकाळातील पेव्हर ब्लॉकच्या कामात घोटाळा झाल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळते. हे प्रकरणही चौकशीच्या फेर्‍यात अडकून शासकीय निधीचा बेकायदेशीर विनियोग करून मर्जीतील कंत्राटदारांच्या माध्यमातून अपहार केल्याचे सिध्द होईल असे संकेत आहेत.