Breaking News

दखल - न्याय व्यवस्थेवरचा विश्‍वास वाढणार

आपल्या देशातील अध्यात्माची वेगळी परंपरा आहे. संताची व्याख्या तपासली, तर काम, क्रोध, मध, मत्सर यांच्यावर ज्यांनी मात केली, त्यांना संतत्त्व प्राप्त होतं. विषयलोलूप असणार्‍या संत म्हणणं हा संतत्त्वाचा अपमान आहे. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं, तर अशा कथित संताला मोजूनी पैजारा मारल्या पाहिजेत. जोधपूरच्या न्यायालयानं ती जबाबदारी अतिशय उत्तमरीतीनं पार पाडली आहे. राजस्थानमध्ये जोधपूर आहे. आसाराम बापूचं सर्व साम्राज्य गुजरातमध्ये होतं. आसाराम संतत्त्वाला काळिमा फासत होता. तो व त्याचा मुलगा धर्माच्या आडून अधर्म करीत होता. दोघांनाही अटक झाली, तरी राजस्थान सरकारच्या आदर्श पुरुषांच्या पुस्तकात त्याचा धडा होता. त्यावर आवाज उठविल्यानंतर तो काढून टाकण्यात आला, हा भाग वेगळा. 

पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्राच्या काही भागातील शाळांत आसाराम बापूंची पुस्तकं वाटून त्यावर परीक्षा घेतल्या जात. आपल्या कथित अध्यात्माच्या जोरावर आणि उच्चपदस्थांशी असलेल्या संबंधाच्या जोरावर आपली कृष्णकृत्यं झाकून जातील, असं आसाराम व त्याच्या मुलाला वाटलं असेल; परंतु तो त्यांचा भ्रम होता. कायद्याचे हात लांब असतात आणि ते शिक्षेचा फास गळ्याभोवती आवळू शकतात, असं जोधपूर न्यायालयाच्या निकालाच्या निमित्तानं दिसलं, हे बरं झालं. जोधपूरमधील न्यायालयानं आसाराम बापूसह सर्व आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना शिक्षा काय होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता. आसाराम आश्रम चालवित नव्हता, तर कुंटणखाने चालवित होता, असं म्हटलं, तर वावगं ठरणर नाही. त्यात फरक इतकाच की कुंटणखान्यात वेश्या स्वखुशीनं व्यवसाय करतात, तर इथं शिक्षणासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आलेल्या मुलींच्या असाह्यतेचा फायदा घेऊन त्यांची अबु्र आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई लुटत होते. इथंही साईच्या नावाची बदनामी करण्याचं काम होत होतं.
उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणार्‍या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामनं जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. देश स्वातंत्र्य दिनाची तयारी करीत असताना आसाराम मात्र त्याच रात्री काळं कृत्य करीत होता. आसारामला इंदूरहून अटक करून 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आलं होतं. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व 4 सहआरोपींवर 6 नोव्हेंबर 2013 रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या खटल्याची सुनावणी 19 मार्च 2017 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि 16 डिसेंबर 2017 रोजी ती एस.सी.-एस.टी. प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडं वर्ग करण्यात आली होती. अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रकरणांच्या विशेष न्यायालयात या खटल्यातील अंतिम युक्तिवाद 7 एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयानं या प्रकरणात निकाल दिला. आसारामबापूसह शिल्पी, शिवा, प्रकाश आणि शरदचंद्र या सर्वांना न्यायालयानं दोषी ठरवलं. आसारामला जन्मठेपेची शिक्षा जोधपूर न्यायालयाने सुनावली. या निकालावर आसाराम अपील करणार हे नक्की. त्याला भारतीय न्यायव्यवस्थेनं तो अधिकार दिला आहे. देशभर वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटना आणि त्याविरोधात असलेला आक्रोश लक्षात घेता आसारामच्या बाबतीत ज्या काही प्रक्रिया असतील, त्या लवकर पूर्ण करून त्याला शिक्षा झाली, तर लोकांचा क ायद्यावरचा आणि न्यायालयावरचा विश्‍वास वाढेल. आसारामनं अनेक कळ्या कुस्करल्या असून अशा लिंगपिसाटाला लवकर शिक्षा झाली, तर खर्‍या अर्थानं कायद्याचीही बूज राखली गेली असं म्हणता येईल. आसारामला शिक्षा झाल्यामुळं आपल्याला न्याय मिळाला असल्याची भावना त्या मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. आसारामवर अन्य प्रक रणांतही गुन्हे दाखल असून त्या पीडितांनाही न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
आसाराम व त्याचा मुलगा वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात असताना त्याच्या भक्त परिवारानं बाहेर धुडगूस घातला होता. कायदा हातात घेेण्याचं काम चालू होतं. या प्रकरणातील एकू ण 44 साक्षीदारांपैकी 9 साक्षीदारांवर जीवघेणे हल्ले झाले. त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. इतर साक्षीदारांनाही जीवे मारण्याची धमक्या येत आहेत. महेंद्र चावला यांच्यावर 13 मे 2015 रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. ते म्हणाले, की माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास असून आसारामला नक्कीच शिक्षा होईल. मी न्यायव्यवस्थेला प्रार्थना करतो की, अशा प्रकारच्या बालात्कार्‍यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी. महेंद्र चावला हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातील सनौली खुर्द या गावचे रहिवासी आहेत. हल्लयानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी 3 पोलिस तैनात करण्यात आले होते. जसजशी कोर्टात सुनावणी होत गेली, त्यांच्या सुरक्षेतही वाढ होत गेली. आता त्यांच्या सुरक्षेसाठी 5 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील मुलीनं 2013 मध्ये आसाराम बापूविरोधात बलात्काराची तक्रार दिली. ही पीडित मुलगी शाळेत भोवळ येऊन पडली होती. त्यानंतर तिला आसारामबापूच्या आश्रमात नेण्यात आलं. तिच्यावर काळी जादू झाली असून तिला काही दिवस आश्रमात ठेवावं, असं तिच्या पालकांना सांगण्यात आले. 15 ऑगस्ट 2013 रोजी आसाराम बापूनं आश्रमात बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला होता. बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या आठवडाभरानंतर आसाराम बापूला अटक करण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी आसाराम बापूला अटक होईपर्यंत उपोषण केलं होतं. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण उचलून धरल्यानं आसारामबापूच्या अटके साठी दबाव वाढत होता. अखेर 31 ऑगस्ट रोजी इंदूरजवळील छिंदवाडा येथील आश्रमात जोधपूर पोलिसांचं पथक पोहोचलं. मात्र, आसारामच्या समर्थकांनी आश्रमाबाहेरच पो लिसांना रोखून ठेवलं. आसाराम बापूची प्रकृती चांगली नसल्याचं कारण पोलिसांना देण्यात आलं. जवळपास आठ तास पोलिसांना आश्रम परिसरात ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी इंदूरमधील वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल दिल्यानं आसाराम बापूच्या समर्थकांचा नाईलाज झाला. अखेर मध्यरात्री उशिरा आसाराम बापूला अटक करण्यात आली. यानंतर 1 सप्टेंबर रोजी आसाराम बापूला विमानानं दिल्लीमार्गे जोधपूरला नेण्यात आलं. आसारामबापूच्या अटकेनंतर त्याच्या समर्थकांनी देशभरात निदर्शनं आणि मरेल रोकोफच्या माध्यमातून थयथयाट केला होता. 16 वर्षांच्या मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी 9 नोव्हेंबर 2013 रोजी आरोपपत्र दाखल केलं. सुमारे हजारभर पानी आरोपपत्रात पोलिसांनी आसारामविरोधात बलात्कार (कलम 376), जिवे ठार मारण्याची धमकी (कलम 506), महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशानं हावभाव किंवा कृती करणं (कलम 509) अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पॉस्को अ‍ॅक्टचाही यात समावेश होता. आरोपपत्रात 121 दस्तावेज तसंच 58 जणांच्या जबानीचा समावेश होता. या प्रकरणात शिल्पी, शिवा, प्रकाश आणि शरदचंद्र हे सहआरोपी आहेत.
बलात्कार प्रकरणात 2014 पासून न्यायालयात सुनावणी सुरु झाली. मात्र, सुनावणी सुरु होताच आसारामबापूच्या समर्थकांनी साक्षीदारांना लक्ष्य करायला सुरुवात केली. या प्रक रणातील मुख्य साक्षीदार आणि आसाराम बापूचा सेवक अमृत प्रजापती यांच्यावर 23 मे 2014 मध्ये राजकोटमध्ये गोळीबार करण्यात आला. यात गंभीर जखमी झालेल्या प्रजापती यांचा 15 दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आयुर्वेद डॉक्टर असलेले प्रजापती अनेक वर्षे आसाराम बापू यांच्या आश्रमात काम करीत होते. आसाराम बापूंना लहान मुलांसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत बघणारे प्रजापती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. 2005 मध्ये त्यांना आश्रमातून काढून टाकण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांनी आसाराम बापू यांच्याविरोधात रण पेटवलं होते. अध्यात्माच्या नावावर आसाराम बापू व त्यांचा मुलगा नारायण साई हे दोघे अनेक छुपे कारनामे करत असल्याचा आरोप करून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. महिलांशी गैरवर्तन, जडीबुटीच्या नावावर अंमली पदार्थांचं सेवन, रतलाममधील आश्रमात अफूची शेती अशा प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी आसाराम बापू यांच्यावर केले होते. आणखी एका बलात्कार प्रकरणात आसाराम बापूविरोधात साक्ष देणारे अखिल गुप्ता (वय 35) यांचीदेखील 11 जानेवारी 2015 रोजी हत्या करण्यात आली होते. अखिल गुप्ता हे आसाराम बापूचे माजी खानसामा व सहकारी होते. याशिवाय राहुल सचान हा साक्षीदारही बेपत्ता झाला होता. साक्षीपुराव्यात छेडछाड करणारे, कायद्याला स्वतःपुढे झुकवू पाहणारे आणि अंध भक्तांची साथ मिळवून कोणतंही कृष्णकृत्य करू पाहणार्‍यांना न्यायालयाच्या निकालानं चांगलीच चपराक बसली आहे.