Breaking News

‘फरार आर्थिक गुन्हेगार’ वटहुकूमावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली : कोट्यावधींची संपत्ती हडप करुन देशाला चुना लावणार्‍या मोदी, मल्ल्यांसारख्या घोटाळेबहाद्दरांच्या संपत्तीवर यापुढे टाच आणणे शक्य होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या ’फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक -2018’ च्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. विधेयकात करण्यात आलेल्या तरतूदीनुसार फरार आर्थिक गुन्हेगारांच्या संप्ततीवर टाच आणणे सुलभ ठरेल. तसेच केवळ देशांतर्गत नव्हे तर परदेशातील संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी यापुढील काळात सरकार कार्यवाही करू शकते. तब्बल 31 घोटाळेबहाद्दर गंडा घालून गेले देशाबाहेर, सरकारची लोकसभेत माहिती. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. पंजाब नॅशनल बँकेने बुडीत कर्जाची वसुली करण्यासाठी हाँगकाँग उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फरार आर्थिक गुन्हेगार विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. त्याअंतर्गत देशाला चुना लावून पसार होणार्‍या आरोपींना पुन्हा देशात आणून त्यांच्याविरोधातील सुनावणी सुरू करणे शक्य होणार आहे. ज्या देशांमध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची संपत्ती आहे, त्या देशातील न्यायालयात पंजाब नॅशनल बँक धाव घेणार आहे.