Breaking News

विद्यार्थिनींचा विनयभंग , प्राथमिक शिक्षकास सात वर्षे सक्तमजुरी


नेवासा तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग करून गैरवर्तन करणारा प्राथमिक शिक्षक फक्कड नारायण शिंदे यास 7 वर्षाची सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने कारावास व दुसर्‍या आरोपान्वये 6 महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर हकीकत अशी की फक्कड नारायण शिंदे (वय 41) रा.खरवंडी ता.नेवासा हा शिक्षक होता. त्याने मुलींशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत असे व त्या मुलींना घरी सांगू नये म्हणून धमकावीत असे. एका मुलीला जास्तच दुखायला लागल्याने तिने घरी सांगितल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. सदरच्या प्रकरणी पालकांनी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्यामध्ये 354 सह बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा.ए.एल.टिकले यांचे समोर झाली सरकारी पक्षातर्फे पीडितांचे व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. न्यायालयाने समोर आलेल्या पुराव्यावरून व सरकारी पक्षातर्फे केलेल्या युक्तिवाद ग्राह्य घरून आरोपी फक्कड नारायण शिंदे यास लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 10 अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने कारावास व भा द वी कलम 506अन्वये 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील एम.आर.नवले यांनी काम पाहिले. त्यांना सदरच्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी डी. व्ही.पेठकर, पोलीस हेडकॉस्टेबल रेवणनाथ मरकड, पोलीस ना.एस.बी.बटूळे, सहा फौ. बी. एन. गडाख, पो.नाईक एम. पी शिंदे, पो.कॉन्स्टेबल एस. जे. हजारे, पो.कॉन्स्टेबल जी. के.अडागळे यांनी सहकार्य केले.