Breaking News

स्व-विकास आणि कलारसास्वाद प्रशिक्षण उत्साहात


कोपरगाव ता. प्रतिनिधी - शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे आयोजित या इयत्ता १० पुनर्रचित अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक प्रशिक्षण दि. ५ एप्रिलपासून सुरू झाले आहे. यात या वर्षापासून इयत्ता दहावीला नव्यानेच आलेला विषय स्व -विकास व कलारसास्वाद या विषयाचे प्रशिक्षण नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.

या राज्यस्तरीय प्रशिक्षणाकरिता कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक संदीप चव्हाण व पोहेगाव येथील कला शिक्षक झुंबर जावळे यांची निवड झाली होती.दि. १९ रोजी तालुकास्तरावर कोपरगाव येथील के. बी. पी.विद्यालयात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या नव्याने आलेल्या विषयाची माहिती देतांना चव्हाण आणि जावळे यांनी सांगितले, जागतिकीकरणाच्या २१ व्या शतकात आवश्यक असलेली जीवन कौशल्य आत्मसात करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या करिअरच्या यशस्वी वाटचालीसाठी योग्य ते मार्गदर्शन या पाठ्यपुस्तकातून मिळणार आहे. पुढील जीवनातील आव्हानांना विद्यार्थ्यांनी सक्षमपणे कसे सामोरे जावे, तसेच स्व -ओळख करून घेऊन, स्वतःच्या संधी ओळखण्याची क्षमता निर्माण व्हावी, मानवी जीवनातील कलेचे अनन्य साधारण महत्त्व, कलेमुळे आपले आयुष्य समृद्ध होण्यास होणारी मदत हे सर्व घटक या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळणार आहेत. या विषयाचे मूल्यमापन प्रथम सत्र पन्नास गुण व द्वितीय सत्र पन्नास गुण असे वार्षिक शंभर गुणांचे मूल्यमापन असणार आहे. या प्रशिक्षणास कलाशिक्षक व अभ्यास मंडळ सदस्य संतोष तांदळे, दुसरे अभ्यास मंडळ सदस्य अशोक गायकवाड, कलाशिक्षक संदीप चव्हाण, कलाशिक्षक झुंबर जावळे, केबीपी विद्यालयाचे मुख्याध्यापक गीताराम ठाणगे, पर्वत उ-हे, अतुल कोताडे यांचे मार्गदर्शन लाभले .