Breaking News

दिव्यांग महिलेने दोघांना गंडवले; तरुणांनी दिली तक्रार


लोणी येथील एका दिव्यांग महिलेने फेसबुक अकाउंटवर एका सुंदर मुलीचा प्रोफाइल फोटो लावून लोणी आणि राहुरी येथील दोन तरुणांना २ लाख १५ हजार रुपयांना गंडा घातला. फसवणूक झालेल्या दोन्ही तरुणांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. 
राहुरी फॅक्टरी येथील एका दिव्यांग तरुणाची फेसबुकवर या महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. मात्र या महिलेने खरी ओळख लपवून या तरुणासोबत फेसबुकवरुन प्रेमाच्या गोष्टी सुरु केल्या. दोन वर्षे फेसबुकवर सुरू असलेल्या चॅटिंगद्वारे या महिलेने राहुरी फॅक्टरी येथील दिव्यांग तरुणाला लग्न करण्याचे अभिवचन दिले. या तरुणाने कधी १० हजार, कधी २० हजार असे वेळोवेळी १ लाख ७० हजार रुपये सदर महिलेच्या बँक खात्यात टाकले.

दरम्यान, लोणी येथील सदर महिलेचा मोबाइल हरवला होता. तिच्याच गावातील एका तरुणाला तो मोबाइल सापडला होता. त्याने तो मोबाइल तिला परत दिला. या काळात त्याच्याशी ओळख करुन त्या तरुणालादेखील खोटेनाटे सांगून ४५ हजार रुपयाला गंडवले. फसवणूक झाल्याचे समजताच लोणी येथील व राहुरी फँक्टरी येथील तरुणांनी आपल्या नातेवाईकांसह राहुरी पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सदर महिलेला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. या महिलेची उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.